प्रवचने – रूपाची ओळख नामानेच होते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


नुसत्या शास्त्रपठणामुळे होणार्‍या ज्ञानापेक्षा भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये, नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते; म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणार्‍याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे, साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो; म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे, तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहीजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व, आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो.

सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात् भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात् गुणांची आणि भावांची जरूरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली; प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे ! तुकारामबुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला ‘राम’ म्हणाले नाहीत, किंव दत्ताला ‘महादेव’ म्हणाले नाहीत. जगत् हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहाते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेपलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय; आणि जे सत्य आहे, ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय.

भगवंताची रूपे जेथून येतात, तेथे ‘नामा’चे वास्तव्य आहे.


Back to top button
Don`t copy text!