प्रवचने – साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आपल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तर्‍हेने भगवंताची ओळख करून घेता येईल. मारूतीने दास्यत्वाने भक्ती केली. दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले. भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे. मनुष्य जे जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते. हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली. त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुला-बाळांचेही नुकसान होते आहे. पण आपले व्यसन ते हट्टाने सोडीत नाहीत. हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला ! माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पणभक्ती होते. आपण देवाची भक्ती करतो. परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही; याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते. ती प्रथम एकाग्र करावी. थोडे करावे, पण एकाकार होऊन करावे.

परमार्थ कंटाळवाणेप्रमाणे करू नये. आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे. परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो, हा दोष कुणाचा ? आपल्या भावनेचाच. जशी भावना ठेवू तशी कृती होते. भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा. दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते; म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे. साधनावर सतत जोर द्यावा. तालासुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे ? मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो, तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले. भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे, त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी, आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे. झाल्यागेल्याचे दुःख करू नका, उद्याची काळजी करू नका, आणि आजचे अनुसंधान चुकवू नका. भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे. प्रत्येक नामात ’भगवंत कर्ता’ असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही. लाभहानीचे सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय. देहाच्या कर्तुत्वाच्या मर्यादा सांभाळून, विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे, हेच खरे सीमोल्लंघन होय. जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे, तसेच जो ’माझ्या सुखाकरीता सर्व जग आहे’ ही बुद्धी ठेवतो, तो मनुष्य अभिमानी समजावा. मनुष्य जितका स्वार्थी, तितका तो पराधीन असतो. पाचजणापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच, आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय.

’भगवंत आहे’ या भावनेपासून साधकाने सुरूवात करावी,
आणि ’भगवंत आहेच’ या भावनेमध्ये समाप्ती करावी.


Back to top button
Don`t copy text!