प्रवचने – आपण मागावे फक्‍त एका रामाजवळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना, लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे. जगात घडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे, तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्‍न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. खरोखर, आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे देईल त्यांत समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्‍याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.

माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी ‘राम राम’ म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री-पुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो, जी जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. ज्या वेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.

राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.


Back to top button
Don`t copy text!