प्रवचने – आसक्ति भगवंताची असावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरूरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो. खरोखर, मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग ? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग ? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की, माझा लोभ कमी व्हावा. खरे म्हणजे, आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत बसतो; इथेच आपले चुकते. काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ, एकाला सांगितले की, हातपाय न हलवता, काही न करता, स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणे जरूरच आहे, तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेत झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो ? तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे ? तर ते भगवंतासाठी होय. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे, तरच मानव सुखी होईल.

सुधारणांनी सोई केल्या, म्हणजे देहसुख वाढविले. त्याने परावलंबित्व मात्र आले; आणि परावलंबनात खरे सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती. विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे, किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत. विद्वानालासुद्धा ‘मला नोकरी द्या’ म्हणून अर्ज करावा लागतो; ,म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत. त्या कशाही मिळवाव्यात. पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर, तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवाणे राहू नये, पण त्यामध्ये आसक्ति असू नये. आसक्ति भगवंताच्या ठिकाणी असावी, आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे. ‘ कुणी शत्रु नाही आणि मित्र नाही ‘ अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते; त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय. हीच विद्या होय, हाच खरा धर्म होय, आणि हेच परमार्थाचे सार होय.


Back to top button
Don`t copy text!