
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर: वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने, धरणातून नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. आज, सोमवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता विसर्ग वाढवून तो १७,१११ क्युसेक्स इतका करण्यात आला आहे.
निरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ही माहिती दिली असून, नीरा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, तसेच आपली जनावरे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन, नदीपात्रातील विसर्गात आणखी वाढ किंवा घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.