आपत्ती येऊच नये.. मात्र आलीच तर सज्जता हवी – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । अलिबाग । मनातील खरी इच्छा आहे ती आपत्ती येऊच नये अशी.. मात्र आलीच तर उद्भवलेल्या परिस्थितीस तोंड देण्याची आपली सर्व प्रकारची सज्जता हवी आणि ही सज्जता केवळ प्रशिक्षणामुळेच येऊ शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

महासमादेशक, होमगार्ड, नागरी संरक्षण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथील जंजिरा सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, मुंबई श्री.संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, प्रांताधिकारी श्री.प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मीनल दळवी, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे उपनिरीक्षक प्रकाश सोनटक्के, होमगार्ड पुरुष महिला जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे स्वयंसेवक श्री.गुरुनाथ साठलेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, जिल्हा नियोजन, स्थानिक आमदार निधी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या एकत्रित निधीतून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामुग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साधनसामुग्रीचा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी निश्चितच उपयोग होऊ शकेल. पोलीस विभागासाठी लवकरच बहुउद्देशीय सभागृह उभारले जाणार आहे. नुकतेच जिल्हा नियोजनच्या निधीतून पोलीस विभागासाठी नवी वाहने देण्यात आली आहेत. पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ओपन जिम तसेच महिलांसाठी देखील जिमची स्वतंत्र निर्मिती करण्यात येईल. जिल्ह्यासाठी “रॅपिड रेस्क्यू वेहिकल” लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

महाड येथे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या सहकार्याने महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी बेसकॅम्प स्थापित होण्याच्या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी आयोजकांना सूचित केले की, आपत्तीच्यावेळी विमोचन कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि जिल्हा प्रशासनाची विमोचन पथके यांचे एकत्रित प्रशिक्षण व बैठका घेण्यात याव्यात, जेणेकरून प्रशासन व या विमोचन कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांचा आपापसात उत्तम समन्वय साधला जाईल आणि त्यातून आपत्ती व्यवस्थापन कार्यात सुसूत्रता येईल.

यावेळी अतिरिक्त नियंत्रक श्री.जाधव यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासाठीच्या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वयंसेवक घडविले जातील, अशी ग्वाही दिली.

या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण साहित्याचे परिक्षणही केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.

 


Back to top button
Don`t copy text!