निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


किनारपट्टीवर संपूर्ण सावधानता, एनडीआरएफ तुकड्याही तैनात : मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत व्हिसीद्वारे बैठक

स्थैर्य, मुंबई, दि 1 : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध  

मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात  

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हीसीसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!