दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । फलटण । सातारा प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या आदेशान्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले असून फलटण तालुक्यातील नागरिकांनी याबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी कळविले आहे की, दिनांक 19 सप्टेंबर रोजी साजरी होणारी अनंत चतुर्दशी, जिल्ह्यात वाढत असणारा कोरोना संसर्ग यासह मराठा आरक्षण, इतर मागास वर्गाचे आरक्षण, केंद्र शासनाचे कृषी कायदे, वीज बील, टोल माफी आदी प्रश्नांवर राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सल्ल्यानुसार दिनांक 16 सप्टेंबर 2021 च्या दुपारी 12 वाजलेपासून दिनांक 22 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात शस्त्र बंदी व जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकार्यांनी निर्गमीत केले आहेत. त्यानुसार या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुर्या, काठ्या किंवा शारीरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू वापरण्यास मनाई आहे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेण्यास मनाई आहे. दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्र, फेकावयाची हत्यारे किंवा साधने बरोबर घेणे, जमा किंवा तंयार करण्यास मनाई आहे. व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्यांचे प्रतिमाचे प्रदर्शन करण्यास मनाई आहे. सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे यास मनाई आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्था राखणेसाठी कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस या कालावधीत मनाई करण्यात आली आहे.
तरी सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.