दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । सातारा । कण्हेर धरणांमध्ये 6 टक्के उपयुक्त (अनुज्ञेय) सिंचन क्षेत्रापैकी किती टक्के पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे दिले जाते व किती शिल्लक आहे याची पडताळणी करुन अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास त्यानुसार वाढीव क्षमतेचे धरण बांधण्याबाबत पडताळणी करून योग्य तो प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जलसंपदा विभागाला दिले.
नियोजन भवन सातारा येथे बोंडारवाडी ता. जावली धरण प्रकल्पासंदर्भात व त्याखाली येणाऱ्या 54 गावांसंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी रोहयो विजया यादव, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प एस. एस. शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजय मोकाशी व सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जलसंपदा विभागाने 21 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये जलाशयातील प्रकल्पीय सिंचन परिक्षेत्राच्या 6 टक्के पर्यंत उपसा सिंचनासाठी अनुज्ञेय क्षेत्र असून आज अखेर 3 टक्के पर्यंत परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात ही उपसा परवानगीची मागणी झाल्यास कण्हेर जलाशयातून उपसा परवानग्या द्याव्या लागणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, K-1 शेतीच्या पाण्यासाठी तरतुदीमध्ये काही वाव आहे का याबाबतची माहिती जलसंपदा विभागाने घ्यावी. कण्हेर धरणामध्ये 6 टक्के अनुज्ञेय सिंचन क्षेत्रापैकी किती टक्के पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे दिले जाते व किती शिल्लक आहे याची पडताळणी करावी. तसेच अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास त्यानुसार वाढीव क्षमतेचे धरण बांधणे बाबत पडताळणी करून योग्य तो प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.