हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी धूळ नियंत्रणासाठी कठोर उपाय योजण्याचे वायू गुणवत्ता आयोगाचे निर्देश


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २५ : एनसीआर आणि परिसरामध्ये दिवसेंदिवस हवेमध्ये वाढणा-या प्रदूषणाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने घेतला. दिल्ली- एनसीआर आणि परिसरामधील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी धूळ नियंत्रणासाठी उपायांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

दिल्ली-एनसीआर आणि परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावर चाललेली बांधकामे त्याचबरोबर करण्यात येणारे पाडकाम, यामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. अशी कामे करताना, जे नियम निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसारच काम करण्यात यावे, धुळीकण हवेमध्ये मिसळणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती यांनी निरीक्षण पथके नियुक्त केली आहेत. या पथकांनी ज्या भागात असे काम सुरू आहे, त्याची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय योजनांची अंमलबजावणी होते की नाही, याचे निरीक्षण करून योग्य ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

या संदर्भात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात आले नाही, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच बांधकाम अथवा पाडकाम थांबविण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

 


Back to top button
Don`t copy text!