स्थैर्य, पुणे, दि.१७: येथील कैलास सातपुते यांना गाडीचा धक्का लागला म्हणून सिने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर यवत जि. पुणे येथील पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश मांजरे हे एम. एच. 01 डि. एल. 1900 या आपल्या कारने व कैलास सातपुते हे एम. एच. 45. ए. एल. 0019 हे त्यांचा वाहनातून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. सातपुते यांच्या वाहनाला ओवरटेक करून मांजरेकर पुढे निघाले असता त्यांना तीन चाकी वाहन आडवे आल्याने मांजरेकर यांनी त्यांच्या गाडीला ब्रेक मारला. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या सातपुते यांच्या गाडीचा धक्का बसल्याने वाद निर्माण झाला. या वादातून महेश मांजरेकर यांनी मारहाण केली असा आरोप सातपुते यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री 9 वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पासून 1 किलोमीटर अंतरावर घडला. दरम्यान कैलास सातपुते यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून मांजरेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांनी कारला अचानक ब्रेक लावल्यामुळे माझी गाडी त्यांच्या गाडीला जाऊन धडकली. यामध्ये त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी शिवीगाळ करत गालावर चापट मारली असल्याचे कैलास सातपुते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
गाडीला धडक बसल्यानंतर मांजरेकर खाली उतरून गाडीची पाहणी करत होते. यावेळी त्यांचा फिर्यादीसोबत वाद झाला. त्यानंतर मांजरेकर यांनी शिवीगाळ करत आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महेश मांजरे एका व्यक्तीला तू दारू पिऊन गाडी चालवतो असे म्हणून चापट मारली, कोण दारू पिले होते याची चौकशी करण्याची मागणी सातपुते यांनी केली आहे.