प्रभाग ७ मध्ये थेट ‘टक्कर’ ! राजे गटाचे पांडुरंग गुंजवटे विरुद्ध खासदार गटाचे अशोकराव जाधव? फलटणमध्ये हाय-व्होल्टेज फाईट


स्थैर्य, फलटण, दि. 18 नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ची लढत यंदा सर्वात जास्त चर्चेत आली आहे. कारण, या प्रभागात दोन राजकीय गटांमधील ‘टक्कर’ थेट पाहायला मिळणार आहे. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले अत्यंत विश्वासू आणि नगरपालिकेच्या राजकारणातील जुने जाणते नाव असलेले माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांना मैदानात उतरवले आहे. तर, त्यांच्या विरोधात खासदार गटाकडून अशोकराव जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यामुळे, प्रभाग ७ मध्ये खऱ्या अर्थाने ‘हाय-व्होल्टेज फाईट’ रंगणार असून, संपूर्ण शहराचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

पांडुरंग गुंजवटे हे फलटण नगरपालिकेच्या वर्तुळातील एक अनुभवी आणि जुने व्यक्तिमत्त्व आहेत. केवळ नगराध्यक्ष पद भूषवले नाही, तर नगरपालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांचा जनसंपर्क, सर्वसामान्य लोकांशी असलेली नाळ आणि आजवरच्या फलटण शहरातील विविध विकासकामांमध्ये दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत. यामुळे, प्रभागातील नागरिकांना त्यांच्या रूपात एक अनुभवी आणि विकासकामे मार्गी लावणारा चांगला पर्याय उपलब्ध झाला असल्याची जोरदार चर्चा आहे.

एका बाजूला रामराजे नाईक निंबाळकर यांचा भक्कम पाठिंबा आणि स्वतः पांडुरंग गुंजवटे यांचा दांडगा अनुभव व लोकसंपर्क, तर दुसऱ्या बाजूला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पाठिंबा घेऊन अशोकराव जाधव मैदानात उतरत आहेत. यामुळे ही लढत दोन व्यक्तींऐवजी दोन मोठ्या राजकीय गटांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. या प्रभागाचा निकाल दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने, दोन्ही बाजूंनी प्रचारात कोणतीही कसर सोडली जाणार नाही हे निश्चित आहे.

पांडुरंग गुंजवटे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी आपले संपर्क अभियान सुरू केले असून मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. त्यांचा अनुभव आणि विकासकामांचा बॅकग्राउंड मतदारांना आकर्षित करत आहे. आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात गुंजवटे आणि जाधव यांच्यातील ही थेट लढत कोण जिंकणार, रामराजे गटाचा अनुभव वरचढ ठरणार की खासदार गटाचा नवा चेहरा बाजी मारणार, याकडे फलटणकर डोळे लावून बसले आहेत.


Back to top button
Don`t copy text!