दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । सातारा । तंत्रशिक्षण संचालनालयाने डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया सुरु केली आहे. १० वीचे विद्यार्थी २३ जुलै पर्यंत https://poly21.dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरू शकतात. अर्ज करताना केवळ परीक्षेचा बैठक क्रमांक वापरून नोंदणी करायची आहे. १० वी निकालाची वाट पाहण्याची गरज नाही, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निकाल घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण थेट समाविष्ट होणार आहेत. संपूर्ण केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्याने घरबसल्याच अर्ज भरणे, आवश्यक दाखले जोडणे, अर्जाची पडताळणी तसेच अभ्यासक्रमांची व संस्थेची निवड करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी व समुपदेशनासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र सुरु केले आहे. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन, कराडचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली. सातारा जिल्ह्यासाठी डॉ. पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शासकीय,अनुदानित व खाजगी संस्थांमधील प्रवेशासाठी एकच अर्ज करायचा असून कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीनेच अर्जास जोडायची आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०० व राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये शुल्क ऑनलाईन भरायचे आहे. तथापि अर्जाच्या छाननीसाठी ई छाननी तसेच प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाऊन अर्जाची छाननी करता येते. अर्जातील त्रुटींची तसेच अर्ज स्वीकृतीची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. अभ्यासक्रमांची निवड करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर व्हिडिओ पहावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमानंतर विविध उद्योगांमध्ये नोकरी मिळते तसेच पुढील शिक्षणाचे पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीला पसंती देतात. शासकीय तंत्रनिकेतन, कराडमध्ये अत्यल्प फीमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात तसेच विविध शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात. अल्पसंख्यांक,दिव्यांग,आर्थिक दुर्बल प्रवर्ग तसेच आजी माजी सैनिकांच्या मुलांसाठी केंद्रीभूत प्रवेशामध्ये जागा राखीव आहेत.
अधिक माहितीसाठी प्रा. हिंदुराव जाधव ८७८८८९२२२४ व डॉ. राम शिंदे ९४२२९१४९३५ यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज भरणे,कागदपत्रांची पूर्तता करणे व अर्ज निश्चिती दि. २३ जुलै 2021.
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. २६ जुलै 2021.
आक्षेप नोंदवणे व त्रुटींची पूर्तता करणे दि. २७ ते २९ जुलै 2021.
अंतिम गुणवत्ता यादी दि. ३१ जुलै 2021.