दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । वाई । त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कृष्णा नदी तीरावरील सात दगडी घाटांवर दिपाेत्सव होणार आहे.कृष्णा नदी सेवाकार्य फाऊंडेशनच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून येथील ब्राम्हणशाही घाटावर दिपाेत्सव,भावगित व सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी कृष्णा नदी काठावरील सात दगडी घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नागरीक, विविध सामाजिक संस्था व लोकोपयोगी मंडळे दिपाेत्सव करत असतात.मात्र यावर्षी कृष्णा नदी सेवाकार्य फाऊंडेशनचे शहरातील कार्यकर्ते मागील सहा वर्षांपासून नदी स्वच्छता, नदी काठावरील घाट परीसर व मंदिरांची दुरुस्ती डागडुजी करण्याचे काम दर रविवारी एकत्र येऊन अव्याहत पणे सुरु आहे. त्याच निमित्ताने व त्रिपुरारी पैर्णिमेचे औचित्य साधुन गुरुवार दि. १८ नाेव्हेंबर राेजी सायंकाळी सहा वाजता येथील ब्राम्हणशाही घाटावर दीपाेत्सव, भावगिते व सत्संगाचे आयाेजन केले आहे.
सदर कार्यक्रमासाठी आमदार मकरंद आबा पाटील, उप जिल्हाधिकारी पुणे अस्मिता मोरे , पिंपरी चिंचवडच्या उपायुक्त आशा राऊत, सांगलीचे पोलिस विभागीय अधिकारी अजित टिके, निवृत्त विभागीय पोलिस अधिकारी आर. आर.पाटील, उपायुक्त पुणे महानगरपालिका प्रसाद काटकर, उप अभियंता श्रीपाद जाधव, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, वाईच्या पोलिस विभागीय अधिकारी डॉ शीतल जानवे-खराडे, विद्या पोळ, मुख्याधिकारी किरण मोरे, नगराध्यक्ष अनिल सावंत,सर्व नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या फाैऊंडेशनची सुरुवात नदीपात्र व परिसर स्वच्छता याच उद्देशाने सुरू करण्यात आले हाेते. या सहा वर्षामध्ये दर रविवारी हे काम अविरत सुरु ठेवल्यामुळेच लोकसहभागातून ब्राम्हणशाही घाटाचा चेहरा माेहरा बदलण्याचे प्रयत्न सत्यात उतरले.
या कार्यक्रमास वाईकर नागरिकांनी एक पणती स्वच्छतेची हा संदेश घेऊन माेठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आहे.