
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । मराठी ग्रंथ प्रकाशनातील प्रसिद्ध अशा ‘ग्रंथाली’ प्रकाशनाचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आणि व्हिजन महाराष्ट्र फौंडेशनचे संचालक दिनकर गांगल यांनी नुकतीच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
व्हिजन महाराष्ट्र फौंडेशनच्या विशेष माहिती संकलन योजनेसाठी अचलपूर, बदनापूर, शेवगाव, फलटण, दापोली या पाच तालुक्यांची निवड झाली आहे. त्यामधील फलटण तालुक्यातील विशेष माहिती संकलन व विविध क्षेत्रातील मान्यवर यांचेशी संपर्क यासाठी दिनकर गांगल फलटण तालुक्याच्या दौर्यावर आले होते.
यावेळी प्रारंभी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच फलटण तालुक्यातील काही वैशिष्ठ्यपूर्ण धार्मिक, सामाजिक व साहित्यिक उपक्रमांबाबत माहिती दिली व महाराष्ट्र व्हिजन फौंडेशनच्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु असे सांगितले.
या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना दिनकर गांगल यांनी सांगितले की, ‘‘तालुका पातळीवर गावोगावी असणारी सर्व क्षेत्रातील वैशिष्ठ्यपूर्ण उप्रकम, चालीरिती, प्रमुख व्यक्ती व त्यांचे कार्य, स्थानिक संस्कृती या प्रकल्पाच्या माध्यमातून जगाशी जोडून घेण्याचे कार्य करणार आहोत. फलटण तालुक्यातील गावोगावीचे शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, खेळाडू, कलाकार, चित्रकार इत्यादींनी यासाठी सहकार्य करावे’’, असे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, प्रमुख कार्यवाह अमर शेंडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पत्रकार किरण बोळे, प्रसन्न रुद्रभटे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, ‘शब्दमित्र’ (पुणे)च्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी उपस्थित होते.