गुणवरे येथील प्रोग्रेसीव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील गुणवरे येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसीव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी पालखी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. वारकर्‍यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि ‘विठू नामा’चा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ऋषी व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवरेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकर्‍यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा-रूक्मिणी तर कोणी संत बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावरून पालखी सोहळा गुणवरे गावात आला. पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखिल इथे आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.

या कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू उत्तम चव्हाण, कृषी अधिकारी श्री. दिलीप पवार, रामराजे मोटार वाहतूक संघटनेचे चेअरमन व भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन श्री. शिवाजी लंगुटे, मुंजवडी गावचे ग्रामसेवक श्री. विलास डंगाने, खुंट्याचे माजी केंद्रप्रमुख श्री. सुभेदार डूबल, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. पांडुरंग पवार, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विशाल पवार, सौ. सुलोचना पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका पवार, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. किरण भोसले, समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवराच्या हस्ते माऊलीच्या पालखीची पूजा व आरती करण्यात आली. इयत्ता एल. के. जी. ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग सादर केले. इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांनी हरिपाठ सादर केला. इयत्ता ६ वीतील आदित्य कदम या विद्यार्थ्याने उत्कृष्ट असे कीर्तन सांगितले. इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’, यावर सुंदर नाटिका सादर केली. इयत्ता ७ वी व ८ वी तील विद्यार्थ्यांनी डान्स सादर केला. पालकांनी भरभरून विद्यार्थ्याचे कौतुक केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भैरवनाथ विकास सोसायटी व जय हनुमान विकास सोसायटी यांच्यातर्फे श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव विशाल पवार यांचा सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया सपकाळ व सौ. निकिता मुळीक यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. उषा आडके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.


Back to top button
Don`t copy text!