स्थैर्य, पाटण, दि. 1 : ढेबेवाडी-कराड मुख्य रस्त्यालगत गुढे फाट्यानजीक दिंडेवाडीच्या पोहोच रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे दिंडेवाडी (गुढे, ता. पाटण) येथील रस्त्याचा तब्बल 11 वर्षांपासून गुदमरलेला श्वास अखेर पोलीस बंदोबस्तात मोकळा करण्यात आला. त्यामुळे मुख्य रस्त्याकडून गावाकडील येणारा मार्ग सुकर झाला आहे तसेच अनेक गावातील नागरिकांना शेतात ये-जा करण्यास सोईचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
ढेबेवाडी-कराड रस्त्यालगत असलेल्या गुढे फाट्याजवळून दिंडेवाडीकडे रस्ता जातो. याबाबत तेथील अविनाश महिंदकर व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन 1979 च्या दरम्यान रस्ता बनविण्यात आला. त्यानंतर वेळो वेळी त्याची दुरुस्तीही करण्यात आली. सातबारा, सर्व्हे नकाशा व ग्रामपंचायतीकडे रस्त्याची नोंद असून काही वर्षांपूर्वी त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणही करण्यात आले आहे. सुमारे 11 वर्षांपूर्वी रस्त्याच्या सुरुवातीलाच असलेल्या जागेवरून वाद निर्माण झाला. अतिक्रमणामुळे रस्त्याचा तोंडावरचा भाग अरुंद राहिलेला होता. तेवढ्या भागातील डांबरीकरणही अपूर्ण राहिलेले होते. न्यायालयीन लढ्याबरोबरच ना. शंभूराज देसाई तसेच या विभागातील जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनीही जनतेची रस्त्याची अडचण सोडवण्यासाठी विशेष सहकार्य केले. दिंडेवाडीच्या दळणवळणासाठी हा रस्ता जसा गरजेचा आहे तसाच तो गुढे, शिबेवाडी व घोटीलच्या पुनर्वसित गावठाणातील शेतकरी आणि तेथील श्री. साईबाबा मंदिरात दर्शनास येणार्या भाविकांसाठीही उपयुक्त आहे. संबंधित शेतकर्याने रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवावे यासाठी दिंडेवाडी ग्रामस्थांनी विविध पातळ्यांवर दाद मागत लढा सुरू ठेवला होता. त्याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच कराड व पाटण येथील न्यायालयासमोर सुनावणी झाली. मात्र ग्रामस्थांच्या बाजूने निकाल लागूनसुद्धा अतिक्रमण न काढल्याने ते पोलीस बंदोबस्तात काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोजणी अधिकारी देवरे, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी विशाल कांबळे, उपअभियंता कांबळे आदींच्या उपस्थितीत रस्त्याचा गुदमरलेला श्वास जेसीबीच्या साह्याने मोकळा करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणच्या रस्त्याचे लवकरच खडीकरण व डांबरीकरण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
दिंडेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर गेली अकरा वर्षापासून अतिक्रमण होते. याबाबत न्यायालयात दाद मागण्यासह ना. शंभूराज देसाई तसेच जि. प. सदस्य रमेश पाटील यांच्या माध्यमातून खा. उदयनराजे भोसले यांना निवेदन देऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता. अखेर येथील अतिक्रमण काढण्यात यश आले असून येथील दळणवळण सुरळीत होणार आहे.– अविनाश महींदकर, सामाजिक कार्यकर्ते, गुढे (दिंडेवाडी )