
स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑक्टोबर : आर्थिक प्रगती साधताना सामाजिक कार्याचे भान जपणाऱ्या दिलीपसिंह भोसले यांनी व्यसनमुक्ती संघटनेचे प्रमुख बंड्या तात्या कराडकर यांनी केलेल्या एका आवाहनाला तात्काळ प्रतिसाद दिला. कराडकर यांच्या विनंतीवरून त्यांनी कोपर्डे येथील ज्ञानेश्वरी उपवनासाठी १०१ नारळ रोपांची घोषणा केली. भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेवेळी कराडकर यांनी सदिच्छा भेट दिली असता हा प्रसंग घडला.
महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यात नेहमीच हिरिरीने भाग घेतात, असे गौरवोद्गार बंड्या तात्या कराडकर यांनी यावेळी काढले. ज्या व्यक्तीच्या अंगी चांगले गुण असतात, त्यांना समाजात मान मिळतो. भोसले आणि डॉ. प्रसाद जोशी हे समाजाशी आपले नाते विसरून काम करत नाहीत, तर स्वतःला पूर्णपणे झोकून देतात, असेही कराडकर म्हणाले.
कराडकर यांनी आपल्या मनोगतात कोपर्डे गावात उभारण्यात येत असलेल्या ‘ज्ञानेश्वरी उपवन’ या प्रकल्पाची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत गावात दहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते आणि तुम्ही दोघेही (भोसले व डॉ. जोशी) समाजासाठी कल्पवृक्ष आहात. त्यामुळे या उपवनासाठी नारळाची रोपे भेट द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
बंड्या तात्या कराडकर यांनी आवाहन करताच दिलीपसिंह भोसले आणि अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानेश्वरी उपवनासाठी प्रत्येकी १०१ उच्च प्रतीची नारळाची रोपे भेट देणार असल्याचे दोघांनीही जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले.
महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी स्वयं सिद्धा महिला संस्थेच्या अध्यक्षा मधुबाला भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, वारकरी संघटनेचे केशवराव जाधव महाराज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केशवराव जाधव महाराज यांनी केले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून आलेल्या भजन स्पर्धेतील विविध वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.