
दैनिक स्थैर्य | दि. 15 एप्रिल 2025 | मुंबई | फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सद्गुरु व महाराजा संस्था समूहांचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला अर्थात फलटण येथील राजेगटाला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. दिलीपसिंह भोसले यांच्यासमवेत सद्गुरू व महाराजा संस्था समूहाच्या सर्व संचालक मंडळाने सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित समारंभात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिलीपसिंह भोसले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वयंसिद्धा महिला उद्योग समुहाच्या संस्थापिका सौ. मधुबाला भोसले, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांच्यासह सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संचालक उपस्थित होते.
दिलीपसिंह भोसले यांच्या पक्षप्रवेशाने राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये दिलीपसिंह भोसले कार्यरत होते.
फलटण शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दिलीपसिंह भोसले सदैव सक्रिय आहेत. दिलीपसिंह भोसले यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये फलटण शहरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी मार्गी लागलेल्या होत्या. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलटण शहरासाठी सांस्कृतिक भवन असावे म्हणून त्यांनी फलटण येथे सांस्कृतिक भवनाची उभारणी केलेली होती. सध्या याच सांस्कृतिक भवनाची दयनीय अवस्था झालेली बघायला मिळत आहे. फलटण शहरांमध्ये अगदी पुण्या मुंबई प्रमाणे सोयी सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी दिलीपसिंह भोसले नेहमीच कार्यरत राहिले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये दिलीपसिंह भोसले यांच्या पुढाकाराने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली होती. परंतु श्रेयवादामुळे ही यंत्रणा धूळखात पडली आहे. यासोबतच फलटण शहरालगत असलेल्या कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, धुळदेव अशा गावांमध्ये स्मशानभुमी नसल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी इतर शहरांप्रमाणे शववाहिका फलटणमध्ये करण्याचा प्रस्ताव दिलीपसिंह भोसले यांनी नगरपरिषदेकडे दिला होता, परंतु त्यावर आजपर्यंत कार्यवाही होऊ शकली नाही.
दिलीपसिह भोसले यांच्या सामाजिक कार्याची सुरवात राजकारणात येण्यापूर्वीच झाली होती. राजकरणात येण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यस्थापना दिन साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी स्व. श्रीमंत मालोजीराजेंच्या माध्यमातून कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराजांना फलटण येथे कार्यक्रमासाठी बोलावले होते.
फलटण शहर नागरी संघटनेच्या माध्यमातून १९७८ सालापासून ते राजकरणात सक्रिय आहेत. त्यावेळी खुद्द यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदेश डावलत दिलीपसिंह भोसले व युवकांनी बापू भोसले हे फलटण नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर माजी आमदार स्व. चिमणराव कदम व दिलीपसिंह भोसले यांची मैत्री घट्ट झाली. त्यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी ही चिमणराव कदम यांनी दिली होती.
1985 साली त्यांनी नागरी संघटनेमार्फत नगरपरिषदेची निवडणूक दत्तनगर, पोलीस लाईन, पाटबंधारे वसाहत (वॉर्ड नं.8) मधून लढवली. एक नवे कार्यक्षेत्र त्यांना मिळाले. दोनच वर्षात त्यांना नगराध्यक्षपदाचीही संधी मिळाली. त्यावेळी स्व. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे त्यांना सहकार्य मिळाले. त्यांचा नगराध्यक्षपदाचा काळ हा नगरपरिषदेतील कामांचा सुवर्णकाळ होता. याच काळात प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन उभारले गेले. हे देखणे सभागृह झाल्यामुळे फलटणकरांना साहित्य, कला, नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे कार्यक्रम पाहता आले. साक्षात गानकोकिळा लता मंगेशकर यांचाही या भवनमध्ये कार्यक्रम झाला होता. 1989 ते 1993 मध्येही त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. नगरपरिषदेच्या कामात त्यांनी स्वत:चा वेगळा असा ठसा उमटवला होता. 2001 मध्ये त्यांनी नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढवली. पण यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. नगरपरिषद कामाचा त्यांना 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
सहकारात यशस्वी व्हायचे असेल तर कामकाजात पारदर्शकता ठेवावी लागते. सहकारात लोकांनी दिलेला पैसा सहकारासाठीच वापरा, आपल्या प्रपंचासाठी नाही. तरच विश्वासार्हता वाढेल. यावर दिलीपसिंह भोसले यांचा गाढा विश्वास आहे. म्हणूनच आज श्री सद्गुरु हरिबाबांच्या कृपेने एकाच छताखाली 17 संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत.
अलगुडेवाडी येथील कै. हणमंतराव पवार यांनी स्थापन केलेली सहकार महर्षि हणमंतराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्था बंद अवस्थेत होती. ती पुन्हा सुरु केली. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार तत्त्वावर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असलेला हा एकमेव कुक्कुटपालन प्रकल्प आहे. याबरोबरच श्री सद्गुरु हरिबुवा महाराज गृहतारण सह. संस्था मर्या;, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण संस्था मर्या;, फलटण तालुका पतसंस्थांचे फेडरेशन मर्या; फलटण, स्वयंसिद्धा महिला नागरी सह. पतसंस्था मर्या; फलटण, श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्था, फलटण, सह्याद्री सह. शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्या; , स्वयंसिद्धा महिला सह. औद्योगिक संस्था, महाराजा टुरिझम को – ऑप. सोसायटी लि; या सहकारी संस्था प्रगतीपथावर आहेत.
सहकार महर्षी कै.हणमंतराव पवार यांनी अत्यंत दूरदृष्टीने श्रीराम कारखाना परिसरात ‘श्रीराम बझार’ ही शेतकरी, कामगार यांच्या सहकारी भागीदारीतील संस्था उत्तम देखण्या वास्तूने उभारली. आज बझारच्या 11 शाखा कार्यरत आहेत. कै.आण्णांच्या निधनानंतर ह्या संस्थेची धुरा कै.कोडिराम पोकळे व नंतर आण्णांचे मोठे बंधू श्री.महादेवराव (आबा) पवार यांनी सांभाळली व आता त्यांचे चिरंजीव श्री.जितेंद्र पवार अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. दिलीपसिंह भोसले ह्या संस्थेत गेली 20 वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या दूरदृष्टी, कल्पकतेमुळे अण्णांच्या नंतरही या बझारचा लौकीक दिलीपराव उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहेत.
1990 मध्ये त्यातील शहरातील काही शिक्षक दिलीपसिंह भोसले यांच्याकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की या शाळा तुम्ही घ्या. त्यानंतर या शाळा घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रश्न सोडवले. पुढे हीच शाळा बोराटवाडीचे वर्धमान निकम यांना अनुदान मिळाल्यामुळे त्यांच्याकडे गेली. परंतु शिक्षण संस्था काढायचीच असे ठरवून ऑगस्ट 1990 ला श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्था स्थापन केली. पहिल्यांदा बुधवार पेठेतील बोळात बालवाडी, लहान गट, मोठा गट सुरु केला. यावेळी शहरातल्या दर्जेदार शिक्षणाची चांगली पार्श्वभूमी होती. त्यामुळे ‘बोळातली शिक्षण संस्था बोळातच विसर्जित होईल’ अशी चेष्टाही होत होती.
विविध क्षेत्रामध्ये सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्र असो या सर्वच क्षेत्रामध्ये दिलीपसिंहांचेच नाव आघाडीवर येते. फलटण फेस्टिव्हल असेल, स्वयंसिद्धा महोत्सव असेल किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विविध उपक्रम असतील या सगळ्या उपक्रमातून फलटण शहराची सांस्कृतिक उंची वाढविण्याचे काम दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे. फलटण येथे भव्य दिव्य स्वरूपात साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. याचे श्रेय ही दिलीपसिंह भोसले यांनाच जाते.
या सगळ्या कार्यामुळे त्यांना विविधांगी व्यक्तीमत्त्वाचे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यांच्या या कार्याचा उपयोग यापुढील काळात भाजपाचे कार्य करण्यासाठी निश्चितच होईल, यात शंका नाही.
1980 मध्ये मालवाहतुकीच्या टेंपोचा उद्योग चालविणारे दिलीपसिंह भोसले आज 17 सहकारी संस्था, 3 खाजगी उद्योग अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहेत. हा नियतीचा एक चमत्कारच आहे व त्यांच्या कर्तृत्त्वामुळेच हे शक्य झाले आहे. यामध्ये त्यांना हणमंतराव पवारांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे त्यांचे एक मोठे भाग्य आहे. हणमंतराव दिलीपसिंहांच्या सर्व लहान संस्थांवर बारकाईने लक्ष ठेवीत असत. ते त्यांना नेहमी सांगत, सतत चांगले काम करा, बाजारी काम जर तुम्ही केले तर लोक तुमच्या बरोबर येणार नाहीत आणि हा आण्णांचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून अंमलात आणला आहे. आणि त्यामुळे आज त्यांच्या सर्व संस्था व उद्योग अतिशय उत्तम चालू आहेत.
दिलीपसिंह भोसले यांच्या पक्षप्रवेशाने राजे गटाला नक्कीच मोठा धक्का बसलेला आहे तर भारतीय जनता पार्टीची फलटण शहरामध्ये ताकद वाढलेली आहे.
… तर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दिलीपसिंह भोसले विराजमान होणार ?
नगरपरिषदेच्या निवडणुका ह्या येणाऱ्या काळामध्ये केव्हाही लागू शकतात. आगामी होऊ घातलेल्या निवडणुकींमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार आहे. जर खुले आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी राखीव झाले, तर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दिलीपसिंह भोसले हेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रमुख दावेदार असतील. त्यांच्या तोडीचा एकही नेता फलटण शहर भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. दिलीपसिंह भोसले यांच्या झालेल्या प्रवेशाने यावर नक्कीच शिक्कामोर्तब झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दिलीपसिंह भोसले यांचे सामाजिक, शैक्षणिक, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांनी यापूर्वी सुद्धा फलटण शहरात विविध जंगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांच्या फलटण फेस्टिवल व फूड फेस्टिवल तर प्रत्येक फलटणकर कधीही विसरू शकत नाही. आज झालेल्या प्रवेशाने या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात पुन्हा सुरू होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.