सोमंथळी गावातील स्मशानभूमीची दुरवस्था; गवत व झुडूपांचे साम्राज्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सोमंथळी स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय असून स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग बर्‍याच ठिकाणी खचला आहे. स्मशानभूमीत झाडाझुडूपांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे. गावातील विकासावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असले तरी सगळ्यांचा अतिमहत्त्वाचा प्रश्न असलेल्या स्मशानभूमी विकासाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गावाच्या प्राथमिक सुविधेपैकी स्मशानभूमी ही महत्त्वाची गरज असताना आजही गावात दुसरी स्मशानभूमी बनवलेली नाही. आहे तिचीही दूरवस्था झाली आहे. घरात दुःखाचे सावट असताना नागरिक मिळेल त्या जागेत मरणयातना भोगत अंत्यविधी उरकताना पाहावयास मिळत आहेत. स्मशानभूमीला जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी निवार्‍याची सोय नाही. स्मशानभूमीत काटेरी झुडूपे, गवत, तरोटा यांचेच साम्राज्य आहे. जीव मुठीत ठेवून नदीमधून पाणी आणावे लागत आहे. पाण्याची गैरसोय रात्रीच्या वेळी अंत्यविधी करायचा असेल तर वीजपुरवठा नसल्याने धोका पत्करून काळोखात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ‘याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिनु गोड व्हावा…’ अशी प्रत्येकाची इच्छा असते; परंतु मेल्यानंतर सुद्धा मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र सोमंथळीत पाहायला मिळत आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी विकास निधीमधून सोमंथळी ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमी विकास कार्यक्रम राबवावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.


Back to top button
Don`t copy text!