आर्थिक फसवणुकीबाबत दिगंबर आगवणेंच्यासह दोघांवर गुन्हा दाखल;

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 16 एप्रिल 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील विडणी येथील मोहन खरात यांच्याकडून आयुर मल्टी पर्पज निधी लि.च्या माध्यमातून दाम दुप्पट, तिप्पट व चौपट परतावा देतो म्हणून एकूण तीस लाख एक हजार रुपयांच्या विविध माध्यमातून ठेवी स्वीकारून गुंतवणुकीच्या परताव्या पोटी फक्त तीन लाख 60 हजार रुपये दिल्याने व परताव्याची मागणी केल्यावर अ‍ॅट्रॉसिटीची केस दाखल करीन अशी धमकी दिल्याप्रकरणी दिगंबर आगवणे, सौ. जयश्री आगवणे व संतोष आगवणे यांच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशमध्ये भारतीय दंड संहिता 1860 व महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्था) अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, फलटण तालुक्यातील विडणी येथील मोहन लक्ष्मण खरात, वय 40, व्यवसाय शेती व्यवसाय तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करीत होते. त्या सोबतच त्यांची मोबाईल शॉपी सुद्धा होती. खरात यांच्या पत्नी शिलाई काम करीत असल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. दिगंबर आगवणे यांना खरात यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे ज्ञात होते व खरात यांच्या घरी त्यांचे जाणे येणे होते. दिगंबर आगवणे यांनी मोहन खरात यांना आयुर मल्टी पर्पज निधी लि. नावाची बहुउद्देशीय गुंतवणूक संस्था आहे. बर्‍याच लोकांनी त्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही सुद्धा पैसे गुंतवा. तुम्हाला आम्ही दाम दुप्पट, तिप्पट व चौपट परतावा देतो, असे सांगितले. या संस्थेचे कामकाज आपण स्वत: तसेच आपली पत्नी सौ. जयश्री आगवणे व संतोष आगवणे पाहत असल्याची माहितीही आगवणे यांनी खरात यांना वेळोवेळी दिली. त्यामुळे आगवणे यांच्यावर विश्‍वास ठेवून खरात यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून एकूण तीस लाख एक हजार रुपयांची गुंतवणूक आयुर मल्टी पर्पज निधी लि. या संस्थेमध्ये केली. परंतु परताव्या पोटी आगवणे यांनी खरात यांना फक्त तीन लाख 60 हजार रुपये दिले व पैशाची मागणी केल्यावर अ‍ॅट्रॉसिटीची केस दाखल करीन अशी धमकी दिली. म्हणून खरात यांनी आगवणे यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे.

दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी दिगंबर आगवणे यांचेवर विश्‍वास ठेवुन आयुर अर्बन मल्टी पर्पज निधी लि. या कंपनीत एक लाख एक हजार रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर खरात यांनी त्यांचे व त्यांच्या पत्नीचे दागिने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फलटण येथे गहाण ठेवून पाच लाख रुपये 09 डिसेंबर 2020 रोजी जमा केलेले आहेत. दि. 10 डिसेंबर 2020 रोजी खरात यांनी स्वतःचे घर विक्री करून आलेल्या पैशातुन सोळा लाख रुपयांची मुदत ठेव तसेच आई सुलोचना खरात हिचे नावावर दगडु शेठ सराफ मल्टीपर्पज निधी लि. येथुन मोडुन आलेली रक्कम तसेच पत्नी सौ. अर्चना हिच्या खात्यावरून चार लाख रुपये असे आठ लाख रुपये ऑनलाईन प्रणालीद्वारे आयुर या कंपनीत गुंतवणुक केलेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर 2020 रोजी पुन्हा खरात यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातुन चार, चार लाख रुपये असे आठ लाख रुपये ऑनलाईन प्रणाली द्वारे आयुर या कंपनीत गुंतवणुक केलेली आहे. दिगंबर आगवणे यांनी आपल्याला वरचेवर भेटुन तुमचे अजुन कोणी नातेवाईक, मित्र असतील तर त्यांचेपण भले होईल त्यांनाही पैसे कमवून देतो. तुम्ही गुंतवणुक केलेली आहे. जास्त पैसे गुंतवणुक केली तर मी माझ्याकडून फॉरच्यूनर गाडी बक्षीस देईन असे आमिष खरात यांना दाखविले. त्यानंतर आगवणे यांना आपले कोणीही नातेवाईक गुंतवणुक करण्यास तयार नसल्याने पुन्हा स्वत:कडील रोख रक्कम चार लाख रुपये, दोन लाख रुपये, दोन लाख रुपये असे दिलेले आहेत, अशी फिर्याद मोहन खरात यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे.

दिगंबर अत्यावणे यांना दापोली येथे ब्लु डायमंड रिसॉर्ट चालवायला घ्यायचे होते. परंतु त्यांचा बँक सिबील खराब असल्याने त्यांनी हॉटेलचा भाडेपट्टा करार नामा खरात यांच्या नावावर केला. अनामत रक्कम पाच लाख रुपये खरात यांच्या नावावर आगवणे यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या आयुर ऑल इन शॉपीच्या खात्यावरून खरात यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली. त्यानंतर वेळोवेळी त्या हॉटेलच्या डागडुजी व पुर्नजीवन खर्चासाठी रक्कमा खरात यांच्या खात्यावर पाठविल्या. त्या रक्कमा खरात यांनी कामगारांना आगवणे यांच्या सांगणे प्रमाणे दिलेल्या आहेत. खरात व आगवणे यांची मैत्री असल्याने आगवणे यांच्या सांगणेप्रमाणे खरात हे वागत होते. खरात व आगवणे यांची घनिष्ठ मैत्री झाल्याने ते इनकमटॅक्स वाचविण्यासाठी खर्च करण्यास मर्यादा येवु नये म्हणुन खरात यांच्या एचडीएफसी बँकेचे दोन लाख 70 हजार रुपयांची दरमहा मर्यादीचे क्रेडीट कार्ड वापरत होते. त्यांनी वेळेवेळी खरात यांचे क्रेडीट कार्ड वापलेले आहे. सदर क्रेडीट कार्डचा वापर आगवणे यांना करता यावा यासाठी त्यांच्या आयुर ऑल इन वन शॉपी या नावच्या बँक खात्यावरून क्रेडीट कार्डचे पेमेंट करण्यासाठी रक्कमा वेळोवेळी आगवणे पाठवित होते, अशी फिर्याद मोहन खरात यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे.

दिगंबर आगवणे यांना जेडी केमिकल अँड फर्टिलायझर नावाची कंपनी सुरु करण्याची होती. त्यासाठी भांडवल आहे हे दाखविण्यासाठी खरात यांच्या न्यु फेमस मोबाईल शॉपीच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर आयुर ऑलइनवन या शॉपीच्या खात्यावरुन पंधरा लाख रुपये ट्रान्सफर केले व ते त्याच दिवशी जेडी फर्टिलायझरच्या डायरेक्टर रणजीत धुमाळ व प्रणय मतकर या दोघांचे नावे ट्रान्सफर केले. खरात यांनी आगवणे यांना वारंवार प्रत्यक्ष भेटुन, फोनवरुन, व्हॉट्सअप वरती चॅट करून पैशाची मागणी करु लागले. ते सगळे कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअप चॅट खरात यांच्याकडे आहेत. गुंतविलेले पैसे एका वर्षाच्या आत देतो असे अमिष दाखवुन पैसे गुंतवायला लावले. दागिने गहाण ठेवुन घराची विक्री करुन आलेल्या पैशाची मुदत ठेव मोडुन, रोख रक्कम स्वरुपात एकुण तीस लाख एक हजार रुपये खरात यांनी गुंतवणुक केलेली आहे. सदर गुंतवणुकी पोटी परतावा म्हणुन तीन लाख 60 हजार रुपये खरात यांना मिळालेले आहेत. दिगंबर रोहिदास आगवणे, सौ. जयश्री दिगंबर आगवणे, संतोष तुकाराम आगवणे यांनी आपल्याला एका वर्षात पैसे दामदुप्पट करुन देतो अशी अमिष दाखवुन फसवणुक केली आहे. ते राजकीय व आर्थिकदृष्ट्या प्रबळ असुन त्यांनी माझे पैसे हडप केले आहेत. अशा आशयाची फिर्याद खरात यांनी सातारा येथील मा. जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल करणेत आलेली होती. त्यावरुन मा. जिल्हा न्यायालयाच्या आदेशाच्या नुसार फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज शिंदे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!