‘प्रभावी पालकत्व’ या विषयावर सातार्‍यात शनिवारी संवाद


स्थैर्य, सातारा, दि. 20 ऑगस्ट : येथील मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि प्रभुणे क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुप्रसिध्द मनोविकार तज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचा प्रभावी पालकत्व या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार दि.23 ऑगस्ट सायंकाळी 5 ते 6.30 यावेळेत जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. यावेळी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती तर विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सातार्‍यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण, नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन प्रयत्नशील आहे. संमेलनात सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. त्याअतंर्गतच या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आणि डिजीटल युगात पालकत्व हे सुध्दा हे आव्हान आहे. पालकांनी मुलासोबत वागताना काय करावे आणि काय करु नये, मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा, मोबाईलाचा अतिवापर, गैरवापर, स्पर्धात्मक जगात टिकून राहण्याचा तणाव, व्यवसनांचे वाढते प्रमाण या सर्व बाबींवर डॉ. आनंद नाडकर्णी संवाद साधणार आहेत. हा संवात सर्व वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी उपयुक्त आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी हे सुप्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, रेखाटन कलाकर, इतिहासाचे विद्यार्थी, तत्वज्ञान आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध आव्हानांना तोंड देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 1990 मध्ये त्यांनी मानसिक संस्था सुरु केली. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांचे काम अभूतपूर्व आहे. ते मुंबई आणि देशभरातील अनेक उद्योगांसाठी मानसिक आरोग्य, संबंधित विषयांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ते देशातील 30 हून अधिक प्रमुख कॉर्पोरेट अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. मराठीत त्यांनी 27 पुस्तके लिहिले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमने कोविड 19काळात ऑनलाइन, ऑफलाइन मानसिक आरोग्य सेवा सुरु ठेवल्या होत्या. या काळात त्यांनी 450हून अधिक ऑनलाइन वेबिनार आयोजित केले होते. अशा या नामवंत डॉ. नाडकर्णी हे सातारकरांशी संवाद साधणार आहेत. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. डॉ. नाडकर्णी यांच्याशी डॉ. स्वाती संदीप श्रोत्री, डॉ. सौ. चैत्राली संकेत प्रभुणे हे संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि डॉ.संकेत प्रभुणे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!