स्थैर्य, फलटण : करोना वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुमाळवाडी, ता. फलटण येथील निसर्गरम्य वातावरण व धबधबा पाहण्यासाठी, या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंध घातले असल्याने कोणीही पर्यटनाच्या उद्देशाने यावर्षी इकडे येऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल असा इशारा धुमाळवाडीच्या पोलीस पाटील सौ. पल्लवी शरद पवार पाटील यांनी दिला आहे.
सध्या कमी/अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावसामुळे धुमाळवाडी, ता. फलटण परिसरातील मुळचे नैसर्गिक वातावरण अधिक बहरत असताना धुमाळवाडी धबधबा सुरु झाल्याने हे वातावरण अधिक खुलत आहे, तथापी करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या धुमाळवाडी ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी येथे येणाऱ्या विविध ठिकाणच्या पर्यटकांमुळे करोना नियंत्रणात बाधा पोहोचण्याची शक्यता प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व संबंधीत यंत्रणांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दि. १५ जुलै रोजी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १४४ प्रमाणे धुमाळवाडी धबधबा परिसरात करोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बाहेरील व्यक्तींना या भागात प्रवेशास बंदी घातली असल्याने कोणीही पर्यटन अथवा धबधबा पाहण्याच्या उद्देशाने या भागात प्रवेश करु नये असे आवाहन पोलीस पाटील सौ. पल्लवी पवार पाटील यांनी केले आहे.
धबधबा व परिसर बंद करण्यात आल्याने त्या भागात जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरते कुंपण घालुन रस्ता बंद करण्यात आला आहे, सदर कुंपणाच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवाशांना कोणीही त्रास देऊ नये अन्यथा त्यांच्या वर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची नोंद घेण्याचे आवाहन पोलीस पाटील पवार पाटील यांनी केले आहे.