
स्थैर्य, फलटण ,दि. ०५ ऑगस्ट : महसूल दिनानिमित्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात धुमाळवाडी (ता. फलटण) येथील पोलीस पाटील सौ. पल्लवी शरद पवार-पाटील यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील’ पुरस्काराने गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
धुमाळवाडी गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौ. पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
या कार्यक्रमास फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल सौ. पल्लवी पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

