
धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण व परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. धोम-बलकवडी प्रकल्पातून सोडण्यात आलेले आणि येत्या १ ऑक्टोबर रोजी बंद करण्यात येणारे पाणी आता १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला मोठे यश आले असून, याबाबतची सविस्तर माहिती फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी दिली आहे.
धोम-बलकवडीच्या आवर्तनाचे पाणी पूर्वनियोजनानुसार १ ऑक्टोबर रोजी बंद केले जाणार होते. मात्र, सध्याची पिकांची अवस्था आणि पाण्याची नितांत गरज ओळखून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी केली. हे पाणी तातडीने बंद न करता ते १० ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवावे, अशी आग्रही आणि रास्त मागणी रणजितदादांनी त्यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या हिताची ही मागणी जलसंपदा मंत्र्यांनी तात्काळ मान्य केली.
रणजितदादांच्या या तत्पर पाठपुराव्यामुळे मोठा प्रश्न मार्गी लागला असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धोम-बलकवडी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना हे पाणी १० ऑक्टोबरपर्यंत अखंडितपणे सुरू ठेवण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. ऐन गरजेच्या वेळी रणजितदादांनी केलेल्या या यशस्वी प्रयत्नांमुळे पिकांना जीवदान मिळणार असून, शासनाच्या या निर्णयाबद्दल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.



