
दैनिक स्थैर्य । 4 मार्च 2025। फलटण । ‘‘श्रीमंत रामराजे कृष्णा महामंडळाचे ४ एप्रिल १९९७ रोजी उपाध्यक्ष झाले. त्यापूर्वी एप्रिल १९९६ मध्ये कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. धोम बलकवडी धरणाचा १९८८ साली सर्व्हे झाला, १९९४ साली या प्रकल्पाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं आणि १९९५ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. १९९७ साली कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष झालेले रामराजे एक वर्ष मागे जावून मीच कृष्णा महामंडळाला जन्म दिला असं सांगत आहेत. धोम बकलवडीचा प्रस्ताव १९९२ मध्ये शासनाकडे आला असल्याचे पुरावे आहेत. तरीही ते सांगतात कृष्णा महामंडळाचा मी जनक आहे, धोम बलकवडी धरण मी केलं. वास्तविक त्यांचा धोम बलकवडीशी काडीमात्र संबंध नाही’’, असा घणाघाती आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कागदोपत्री पुरावे दाखवत पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेस कृष्णा महामंडळाचे सदस्य माणिकराव सोनवलकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, रणजितसिंह भोसले यांची उपस्थिती होती.
धरण कुठं झालं आहे ते त्यांना माहित नाही
‘‘धरण कुठं झालं आहे ते त्यांना माहित नाही. धरणाला किती खर्च झाला आहे हे त्यांना माहित नाही. कॅनॉल कुठपर्यंत झाले आहेत हेही त्यांना माहित नाही. योगायोगाने ते उपाध्यक्ष असताना धोम-बलकवडीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर माझे वडील, मी त्या महामंडळावर उपाध्यक्ष होतो पण आम्ही असं म्हणणार नाही की कृष्णा खोरे महामंडळाला आम्ही जन्म दिला. रेटून खोटं बोलायचं अशी त्यांची प्रवृत्ती आहे. त्याकाळात लोकांकडं कागदपत्र नव्हती. त्यामुळं त्यांना लोकांना फसवता आलं’’, अशीही टिका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
‘‘कृष्णा महामंडळाच्या अधिकार्यांनी केलेले संशोधन आपण पुढं घेवून चाललो आहोत आणि त्यातून आपल्या तालुक्याचा फायदा करुन घेत आहोत. निरा – देवघरच्या प्रकल्प अहवालातच 0.93 टी.एम.सी. चा उल्लेख आहे. निरा उजवा कालव्यातून 19 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत असल्याची माहिती आपल्याला कार्यकारी अभियंत्यांनीच दिलेली आहे. खंडाळा ते माळशिरस पर्यंत अप्रत्यक्षपणे विविध मार्गाने हे क्षेत्र भिजत आहे. जेव्हा निरा उजवा कालव्याचं पाणी शेतकर्याच्या दारापर्यंत जाणार आहे तेव्हा हे क्षेत्र आणखीन वाढणार आहे. यातून संपूर्ण तालुक्याचा फायदा होणार आहे’’, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कालवा सल्लागार समितीला पाणी वाटप ठरवण्याचा अधिकारच नाही
‘‘कालवा सल्लागार समितीला पाणी वाटप ठरवण्याचा अधिकारच नाही. राम सातपुतेंच्या त्या पत्रात कुठेही फलटण तालुक्याच्या पाण्याचा उल्लेख नव्हता. फलटण, भोर, खंडाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, बारामती, इंदापूर हे अन्य तालुकेही या कालव्याअंतर्गत आहेत. राम सातपुतेंनी मागणी केल्यानंतर अन्य तालुके विरोध करायला का पुढे आले नाहीत? असा सवाल उपस्थित करुन केवळ राजकारण करण्यासाठी, पराभवानंतर लोकांनी आपल्याला कुठंतरी विचारलं पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या तालुक्याचं पाणी कमी होणार आहे असा खोटेपणा केला’’, अशीही टिका यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
तो कृष्णा – भिमा स्थिरीकरण रद्द झाला; आता कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्प
‘‘कृष्णा – भिमा स्थिरीकरण प्रकल्पातून फलटणला पाणी येणार नव्हते त्यामुळे आमचा त्याला विरोध होता. मुळात हा प्रकल्प कधीच रद्द झालेला आहे. कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाबाबत आपण वारंवार बोलत असून या प्रकल्पाला शासनाची तत्वत: मंजूरी मिळालेली आहे. कार्यकारी अभियंत्यांची समिती या प्रकल्पाबाबत पुढील अभ्यास करत असून हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर यातून फलटण, माण, खटाव तालुक्याला पाणी मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सोळशी धरणाच्या सर्वेक्षणाबाबतही टेंडर प्रकिया झालेली आहे. हा प्रकल्प देखील लवकरच पुढे जाणार आहे. ’, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
निरा खोर्यात आणखीन पाणी आहे; ते स्वत:ला पाणीदार म्हणवणार्यांनी आणून दाखवावे या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला उद्देशून देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘निरा खोर्यात 14 टी.एम.सी. शिल्लक पाण्यातील 7 टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला आणि 5 टी.एम.सी.पाणी आंध्रप्रदेशला (मद्रास) देण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे. उर्वरित 2 टी.एम.सी. पाण्यावरही पाणी वापराबाबतचे आरक्षण आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठलेही पाणी शिल्लक नाही’’, असा स्पष्ट खुलासाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला.
‘‘विधानसभा निवडणूकीनंतर टिका – टिपणी करायची नाही. योग्य वाटेल तिथं त्यांचा सल्ला घ्यायचा असं आपण ठरवलं होतं. पण त्यांच्याकडून सारखे आरोप-प्रत्यारोप होत असतात. ज्यांनी बादलीभरसुद्धा तालुक्यासाठी पाणी आणलं नाही, ज्यांनी साधा पाझर तलाव आणलेला नाही त्यांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यांना उत्तर देण्यात काहीही तथ्य नाही. त्यांनीही अभ्यास न करता माझ्यावर बोलू नये’’, असा टोलाही श्रीमंत संजीवराजे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.