पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभाग बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पाटण, दि. २६ : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभाग हा करोना  चा हॉटस्पॉट बनला असून मुंबई, पुण्याचा बहुतांशी घरटी संबंध असलेला हा विभाग मे महिन्यापर्यंत सुरक्षित होता. मात्र जून, जुलै महिन्यात विभागातील तब्बल 28 गावांमध्ये  करोना  ने एन्ट्री केली असून ढेबेवाडी विभागातील करोना   बाधितांची संख्या 80 पार गेली आहे तर 59 जण  करोना  मुक्त झाले असून 4 जणांचा  करोना  मुळे मृत्यू झाला आहे. निसर्गरम्य विभागाला करोनाचा विळखा पडल्याने करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाची पुरती दमछाक झाली आहे. या विभागात दिवसेंदिवस  करोना   रुग्णांची संख्या वाढतच असल्याने चिंताही वाढली आहे.

ढेबेवाडी विभागामध्ये 24 जुलैअखेर धामणी (5), मस्करवाडी (1), आचरेवाडी (1), वाझोली (1), भरेवाडी (1), कसणी (17), बनपुरी (8), भालेकरवाडी (1), सदुवर्पेवाडी (4), सळवे (1), तामिणे (3), आंबवडे (1), कारळे (1), महिंद (3), मान्याचीवाडी (1), शितपवाडी (7), साबळेवाडी (2), शेजवळवाडी (1), कुंभारगाव (6), गलमेवाडी (3), करपेवाडी (1), शेंडेवाडी (4), बागलवाडी (1), तळमावले (1), काजारवाडी (1), चाळकेवाडी (2), खळे (1), साईकडे (2) अशी एकूण 81 रुग्ण संख्या आहे. यापैकी स्थानिक बाधित झालेले 23 तर बाहेरून आलेले 58 जण आहेत. यामध्ये 24 जुलै अखेर 59 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत तर अद्याप 18 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून विभागातील 4 जणांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे.

मार्च महिन्यात पहिल्या लॉकडाउनच्या कालावधीपासून लॉकडाउन शिथिल करेपर्यंत जिल्ह्यात करोना ला आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला चांगले यश आले होते. यामध्ये प्रत्येक ठिकाणी अनावश्यक फिरणार्‍यांवर कारवाई करत कडेकोट नाकेबंदी करणार्‍या पोलीस यंत्रणेला बरेच श्रेय जाते तसेच बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीस शाळेमध्ये किंवा इतर स्वतंत्र ठिकाणी कॉरन्टाईन करण्यात येत होते. त्यामध्ये कॉरन्टाईनच्या नियमाचे पालन कडक करण्यात येत होते. यामध्ये कोरोना ग्रामसमिती, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी त्यांना नियम पाळण्यात केलेल्या सक्तीमुळे करोना आटोक्यात राहिला होता. किंबहुना खेडोपड्यातून करोना चा शिरकाव झाला नव्हता. मात्र लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर तसेच लॉकडाउन हटवल्यानंतर महिन्याभरात जनतेला मिळालेली मोकळीक, नियम पालन सक्तीबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे करोना चा फैलाव सुरू झाला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये करोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील प्रत्येक गावात बहुतांशी कुटुंबाचा मुंबई, पुण्याशी घरटी संबंध येतो. प्रारंभीच्या काळात मुंबई-पुणे तसेच बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला जिल्हा परिषद शाळेमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले. नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली. मात्र नंतरच्या काळामध्ये लॉकडाउन शिथिलतेनंतर मुंबईचे लोंढे विभागात दाखल झाले. काहींनी पास काढले तर काही चोरीचुपेदाखल झाले. नंतरच्या काळात प्रशासनाने राबवलेल्या होमकॉरन्टाईनची संकल्पना खेड्यांमध्येपूर्णपणे फेल गेली असून ग्रामीण भागातील समाजव्यवस्था घेऊन लक्षात घेता छोट्या घरात स्थानिक कुटुंबासोबत मुंबई-पुण्याहून बाहेरगावावरून आलेली व्यक्ती होमकॉरन्टाईन झाली. मात्र व्यक्ती घरातील सदस्यांच्या संपर्कात राहिली. घरचे लोक गावातील लोकांच्या संपर्कात राहिले. त्याचबरोबर बर्‍याच वेळा कॉरन्टाईन झालेली व्यक्ती गावामध्ये अनेकांच्या संपर्कात खुलेआम येत होती. याकडे करोना ग्राम समिती, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे  बाधित सापडलेल्या व्यक्तींच्या निकटवर्तीय संख्येत वाढ झाली. विभागात अनेक गावांमध्ये करोना ने हात-पाय पसरले असून अनेक ठिकाणी करोना ची साखळी वाढतच आहे.

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर सर्व व्यवसाय नियम व अटी पाळून सुरू करण्यासाठी मिळालेली मोकळीक, मात्र ग्राहक किंवा व्यापारी यांनी गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्िंसग पाळण्यासाठी दाखवलेला बेजबाबदारपणा, करोना संपल्याच्या आविर्भावात जनतेने कुठलीही शिस्त न पाळता केलेली अनावश्यक गर्दी, यावर शिस्तीची सक्ती तसेच बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीस स्वतंत्र ठिकाणी कॉरन्टाईनची सक्ती करणे गरजेचे आहे. सध्या असलेल्या  लॉकडाऊनच्या  नंतरच्या काळात सुद्धा नियम पालनाच्या सक्तीबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. करोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी बेशिस्त जनतेला प्रशासनाची नियमपालनाची सक्ती हाच प्रभावी मार्ग ठरणार असल्याचे दिसून येते आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!