ढवळ गावाजवळ भरधाव ट्रॅक्टरची कारला भीषण धडक, महिला ठार, दोनजण जखमी


दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
ढवळ, ता. फलटण गावच्या हद्दीत सपकाळवाडी ते ढवळ जाणार्‍या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने व्हॅगनार कारला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील महिला ठार झाली असून दोनजण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला असून या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

या अपघाताची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास किशोर मारूती ढेंबरे (वय ३३), सुलोचना मारूती ढेंबरे (वय ६०, दोघेही राहणार झिरपवाडी, ता. फलटण, सध्या राहणार अजिंठानगर, आकुर्डी, पुणे) व प्रेम विनोद चव्हाण (राहणार शेरेचीवाडी, ता. फलटण) हे तिघेजण व्हॅगनार कार (एमएच-१४-एफ-८१९७) मधून सपकाळवाडी ते ढवळ रस्त्यावरून जाताना ढवळ गावाजवळ समोरून येणार्‍या भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या कारला भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील सुलोचना मारूती ढेंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर किशोर ढेंबरे व प्रेम चव्हाण हे जखमी झाले आहेत. यातील किशोर ढेंबरे यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!