
दैनिक स्थैर्य | दि. 24 फेब्रुवारी 2025 | फलटण | येथे धर्मवीर संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याचे उदघाटन गुरुवार (दि. २२) रोजी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे हे आहेत. जेष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद नातेपुते शाखेचे अध्यक्ष धैर्यशील देशमुख, सिताराम नरके, सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिह भोसले, प.पू. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज, प.पू. परशरामजी वाघ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षा माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर या असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी सौ. सोनाली सुरेश ढमाळ, युवा कवियत्री, गझलकार या आहेत. तर संमेलनाच्या कार्याध्यक्ष नीलम पाटील आहेत. हे संमेलन ॲग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, जाधववाडी तालुका फलटण यांच्या वतीने आयोजित केले जात आहे. या वर्षी हे संमेलन आठव्यांदा आयोजित केले जात आहे आणि त्याचा मुख्य हेतू अप्रकाशित साहित्यिकांना प्रकाशझोतात आणणे, नवोदित साहित्यिक, नवकवी, महिला आणि साहित्यप्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करणे आहे.
संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांना साहित्य पुरस्कार देऊन गौरविणे, विविध विषयांचे परिसंवाद घेणे, जागतिक महिला दिनानिमित्त तळागाळातील महिलांचा तसेच सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गुणगौरव करणे यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. सातारा जिल्ह्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने भरविणारी ही पहिलीच संस्था आहे.
या कार्यक्रमांमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज साहित्य जीवन गौरव पुरस्कार, विशेष साहित्य सेवा पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, निबंध स्पर्धा पारितोषिक, परिसंवाद, काव्य संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व साहित्यिक, साहित्य प्रेमी तसेच साहित्य रसिकांनी या मेजवानीचा लाभ घ्यावा अशी विनंती ॲग्रोन्युज ट्रस्टचे प्रमुख व संमेलनाचे आयोजक प्रकाश सस्ते यांनी केली आहे.