स्थैर्य, सातारा, दि.१: कराड व सातारा येथील सरकारी रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अपघातातील जखमी कोमात गेल्याचा आरोप करत, संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाटण तालुक्यातील रासाठी येथील प्रकाश कदम यांचा दि. २२ रोजी कोयनानगर येथे अपघात झाला होता. या अपघातात कदम हे बेशुद्ध होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका करून त्यांना कराड येथे उपचारासाठी आणले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी जखमीला सातारला न्यावे लागेल, इथे उपचार होणार नाहीत असे सांगितले.
त्यांचे नातेवाईक त्यांना सिव्हिलला घेऊन गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यासाठी त्यांचे नातेवाईक निघाले होते. पण त्यावेळी डॉ. वाळवेकर यांनी कदम यांना कोरोना झाला असून त्यांना येथून नेता येणार नाही, अशी भूमिका घेतली. या दरम्यान सायंकाळी सात वाजता नातेवाईकांनी डॉ. वाळवेकर यांना समजावून सांगितल्यानंतर सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले.
आता कदम हे कोमात गेले असून याला सर्वस्वी डॉ. वाळवेकर हे जबाबदार आहेत. त्यांच्याकडून नातेवाईकांना उध्दट भाषा वापरली गेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आले.