दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या समर्थनात शेकडो धारकरी काल फलटणमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या धारकर्यांनी फलटण शहरात मोर्चा काढून भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच भिडे गुरूजींचा प्रत्येक शब्द आपल्यासाठी धनुष्यातून सुटलेला बाण असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
भिडे गुरूजींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी तर गुरूजींना अटक करावी, यासाठी प्रचंड प्रयत्न केले. तसेच भाजपानेही गुरूजींचा वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर काल राज्यात ठिकठिकाणी भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ शेकडो धारकर्यांनी मोर्चा काढला. फलटण शहरातही धारकर्यांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढून घोषणा दिल्या.
यावेळी धारकरी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, गुरूजींचा प्रत्येक शब्द श्रीरामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आहे आणि गुरूजींचा प्रत्येक शब्द सत्यच असतो. जगद्गुरू तुकोबारायांनी समाजासाठी आपला संसार जाळला. त्यांचा पुत्र अन्न अन्न करून मेला; परंतु तुकोबाराय थांबले नाहीत. तसेच गुरूजींच्या समाजासाठी झटत आहेत. त्यांच्या खिशात कधी कधी एक रूपयाही नसतो, तरीही ते महाराष्ट्रभर फिरत असतात. कारण त्यांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची फार मोठी दैवी शक्ती आहे. त्यामुळे आपण गुरूजींचे शिष्य आहोत, हे आपले भाग्य आहे.