धनगर समाजाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दादाजी भुसे, आ.अब्दुल सत्तार, आ. सुहास कांदे, माजी आमदार विजय शिवतारे, आयोजक माजी नगरसेवक योगेश जानकर आदी मान्यवर उपस्थित.

धनगर समाजाच्या सत्काराचा स्वीकार करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात  येईल. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. धनगर वाड्या वस्त्यांमध्ये सोईसुविधा दिल्या जातील. तसेच आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल,असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य गजढोल आणि नृत्याद्वारे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा विशेष सन्मान धनगर समाजाकडून करण्यात आला. या मेळाव्यात राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासह प्रलंबित मागण्या आणि समस्यांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

धनगर समाजाच्या विविध  मागण्या यावेळी समाजाकडून करण्यात आल्या. “हे सरकार  समाजातील सर्व घटकांचे सरकार आहे. धनगर  समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल”, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी  दिली.


Back to top button
Don`t copy text!