
दैनिक स्थैर्य । 17 मार्च 2025। सातारा । शहरासह कास परिसरात महाधनेश ऊर्फ गरुड गणेश (ग्रेट पाइड हॉर्नबिल) या पक्ष्याचे दर्शन झाले. या दुर्मीळ, राजबिंड्या पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षिप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. महाधनेश पक्ष्याला मराठी मध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राजधनेश नावानेही ओळखतात. हा पक्षी अरुणाचल प्रांतात मुख्यत्वे आढळतो. काळ्या, पिवळ्या आणि पांढर्या तांबूस रंगांचे आकर्षक रूप आणि मोठ्या चोचीमुळे तो लक्ष वेधून घेतो. आपल्याकडे हा पक्षी अभावानेच दर्शन देतो. सातारा शहरात काही ठिकाणी, तर कास पठारावरील पिसाणी येथे तीन महाधनेश पक्ष्यांचे नुकतेच दर्शन घडले.
आपल्याकडे पश्चिम घाटातील घनदाट सदाहरित आणि अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. दाट आणि उंच झाडी असलेल्या ठिकाणी व लोकांच्या नजरेस पृहुंणार नाही अशा ठिकाणी तो राहतो. उंच झाडावरील विविध प्रकारची फळे त्याचे मुख्य खाद्य आहे. शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून तो आपली आणि उंच झाडाच्या डोलीत बसतो व तेथेच घरटे बांधतो आणि पक्ष्यांना जन्माला घालतो.
जैवविविधतेच्या दृष्टीने हा पक्षी महत्त्वाचा समजला जातो. तो बीजप्रसार करण्यास मदत करतो आणि जंगलाच्या पुनरुत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, त्याचा मूळ अधिवास नष्ट होणे आणि शिकार यामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या पक्ष्याचे अधिवास आणि खाद्य स्रोत टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करतात.
वन्यजीव संशोधक आणि जैवविविधता अभ्यासक. डॉ. अमित सय्यद म्हणाले, महाधनेश या पक्ष्याचे घडलेले दर्शन हे नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने चांगली घटना आहे. याचे आगमन जैवविविधता अधोरेखित करते. या पक्ष्याचे खाद्य कमी होणे हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. हा पक्षी अन्नाच्या शोधात, तसेच प्रजननासाठी आपल्या मूळ अधिवासातून बाहेर आला आहे. हा पक्षी आढळला, तर याचे फोटो आणि स्थळ प्रसिद्ध करू नये, तसेच पक्ष्याला त्रास होणार नाही याची काळजी घेत पक्षिनिरीक्षण करावे.