
दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२३ । मुंबई ।
आषाढी पौर्णिमेला विशेष महत्व आहे, यादिवशी माता महामाया यांना गर्भधारणा झाली, बुद्धत्व प्राप्त होण्याआधी सिद्धार्थाने गृहत्याग केला, धम्मसार ऐकून अहंत झालेले पाच अहंत यांना बुद्धाने प्रथम धम्मदेसना देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले तो धम्मचक्र प्रवर्तनदिन तसेच या काळात पाऊस भरपूर असतो म्हणून भन्तेजी वर्षावास करतात मनन, चिंतन करून धम्माची पुढील वाट चालण्याचा संकल्प करतात परंतु उपसकांचे कर्तव्य काय यावर सविस्तर विचार मांडून वर्षावासचे महत्व काय यावर सविस्तर मार्गदर्शन केले, याकाळात उपासक भन्तेजीना धम्मदान देतात हे दान म्हणजे वस्तू, धन, भोजन परंतु या वर्षावासच्या निमित्त विचार मांडून धम्मदान दिले जाते ते दान म्हणजेच बुद्धांचे वचन असे प्रतिपादन वर्षावास प्रवचन मालिकेत धम्मदेसना देत असताना पूज्य भन्ते विमलबोधी यांनी केले.
बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी आणि संलग्न संस्कार कमिटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे या ही वर्षी वर्षावास प्रवचन मालिकांचे आयोजन संघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बाल क्रीडा मंडळ, नायगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुनी बीडीडी चाळ ए-३/४, एस. एस. वाघ मार्ग, नायगाव – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन तालुका चिटणीस संदेश गमरे, संस्कार समिती चिटणीस कैलास मोहिते, तसेच पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक दीपक मोहिते यांनी केले, प्रस्ताविक सादर करताना संघाने आजवर केलेल्या कार्याचा आढावा व तालुका संघाने जे पुढील संकल्प सोडले आहेत ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या कामाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तद्नंतर संघाचे प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त रामदास तथा राजाभाऊ गमरे, के. सी. जाधव यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून माजी अध्यक्ष सिद्धार्थ पवार, माजी सरचिटणीस संजय तांबे, माजी कार्याध्यक्ष प्रभाकर पवार, कोषाध्यक्ष संजय पवार, संस्कार कमिटीचे अध्यक्ष संदीप गमरे, सरचिटणीस मनोजजी पवार, संजय गमरे, सुविधा कदम आणि त्यांचे सर्व सहकारी, न्यायदान कमिटीचे शशिकांत मोहिते, शिक्षण कमिटीचे नितीन नागे, पतपेढीचे प्रवक्ते शांतिदुत जाधव, मध्यवर्ती संपूर्ण कमिटी विभाग अधिकारी संलग्न सर्व समितींचे कार्यकर्ते, महिला मंडळ आणि सर्व उपासक यांनी भरगच्च उपस्थितीत व आनंदात हा वर्षावासाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला तद्नंतर संघाचे माजी प्रमुख विश्वस्त व्ही. व्ही. जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, सरतेशेवटी संघाचे सरचिटणीस संदेश गमरे यांनी धम्मदान रूपाने या कार्यक्रमास देणगी देऊन मदत करणाऱ्या दानवीरांचे तसेच आजी-माजी कार्यकर्ते, मान्यवर पाहुणे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.