जीवन जगण्याची कला म्हणजे धम्म होय – मुकुंद महाडिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२२ । श्रास्वती । “अज्ञानाला शह देऊन विज्ञानवादी होणे राग, लोभ द्वेष, आळस, संशय या विकारांपासून अलिप्त राहून माणसाने माणसासारखे वागणे आणि विचारहीन अवस्था जगणे म्हणजे जीवन पद्धत, असे जीवन जगण्याची कला म्हणजेच धम्म होय” असे प्रतिपादन बौद्धजन पंचायत समिती संलग्न पर्यटन समितीचे अध्यक्ष मुकुंद महाडिक यांनी धम्म म्हणजे काय ? या विषयावर व्याख्यान देत असताना व्यक्त केले, सदर व्याख्यान ऐकताना मुकुंद महाडिक यांच्या सुश्राव्य व भारदस्त वाणीने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

सदर व्याख्यान बौद्धजन पंचायत समितीच्या पर्यटन समितीच्या विद्यमाने बौद्ध धम्मस्थळांना भेटी देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळाद्वारे देशाटन करीत असता निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरणात पर्यटकांना धम्म सोप्या भाषेत समजावण्याचा हेतूने घेण्यात आले होते, सदर प्रसंगी श्रीधर साळवी यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालनाची धुरा सुरेश मंचेकर यांनी सांभाळली, तसेच प्रवासाचे गाईड दास कांबळे, उपकार्याध्यक्ष अंकुश सकपाळ, राजाभाऊ तथा रामदास गमरे, अंजली ताई मोहिते, रविंद्र लोखंडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

पर्यटन समितीच्या माध्यमातून बुद्धांच्या पवित्र स्थळांना भेट देत देत श्रावस्ती येथील सिध्दोधन राजाचा राजवाडा, जेतवन जेथे बुध्दाने २४ वर्षे वास्तव्य करून धम्माचा प्रचार प्रसार केला ते स्थळ, अंगुलीमाळ गुहा, विशाखा महाल, जागतिक बुद्धविहार आणि स्तूप इत्यादी धम्मस्थळांना भेट देऊबी बौद्ध संस्कृतीचा गौरवशाली व वास्तववादी इतिहासाची माहिती संकलित करत शिष्टमंडळाचे मार्गदर्शक दास कांबळे, मुकुंद महाडिक, सुरेश मंचेकर यांनी शिष्टमंडळास मार्गदर्शन केले, सध्या पर्यटन काळात संकलित केलेला अमोल ठेवा हृदयात साठवत सदर शिष्टमंडळ लखनौला रवाना झाले आहे.

सदर पर्यटन काळात ज्या ज्या बौद्ध स्थळांना भेटी देऊन जगातील सर्वात प्राचीन बौद्ध धम्माचा गौरवशाली परंतु जनमानसात दुर्लक्षित राहिलेला इतिहास आपल्या घरी परतल्यावर आपल्या विभागात, क्षेत्रात, नातेवाईक, मित्र परिवारात आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन सुरेश मंचेकर यांनी केले, सरतेशेवटी गेली पंधरा दिवस शिष्टमंडळास दीपक गमरे कॅटरस यांनी स्वादिष्ट व पोषक आहार देऊन सहकार्य केले तसेच सदर प्रवासात यथाशक्ती मदत व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सुरेश मंचेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!