
स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑक्टोबर : “भगवान बुद्धांचा धम्म हा अथांग ज्ञानाचा सागर आहे. त्यातील ज्ञान प्रत्यक्ष समजून घेऊन आचरणात आणल्याशिवाय अनुभवता येत नाही. त्यामुळे, बौद्ध उपासकांनी त्रिसरण-पंचशील घेण्यापूर्वी भिक्षूंना केली जाणारी ‘याचना’ आणि तिचा अर्थ समजून घेतला पाहिजे, तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो,” असे प्रतिपादन पूज्य भंते काश्यप यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने मौजे समतानगर (विडणी) येथे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील सोळाव्या पुष्पात ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी पूज्य भंते काश्यप यांनी पाली भाषेतील ‘याचने’चे सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, “उपासक ‘ओकास वंदामि भंते’ म्हणून क्षमा व सील ग्रहणासाठी याचना करतात. यात सर्वप्रथम पाच अंगांनी (मस्तक, दोन हात, दोन पाय) तथागतांना, धम्माला व संघाला वंदन केले जाते, यालाच ‘पंचांग प्रणाम’ म्हणतात. त्यानंतर शरीराने, वाणीने किंवा मनाने नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली जाते. मगच, त्रिरत्नांवर श्रद्धा ठेवून पंचशील देण्याची विनंती केली जाते.”
पंचशीलाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, “हिंसा, चोरी, दुराचार, खोटेपणा आणि व्यसन यांपासून दूर राहिल्याने व्यक्तीचे जीवन शांत, शुद्ध आणि नैतिक बनते. शीलामुळेच पुढे प्रज्ञा व समाधी साध्य करणे शक्य होते.”
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष महावीर भालेराव यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर गीत सादर केले. कार्यक्रमास महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, ज्येष्ठ प्रवचनकार सोमिनाथ घोरपडे, साहित्यिक तानाजी जगताप यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार सचिव बजरंग गायकवाड यांनी केले.