मांजरपाडा प्रकल्पातील देवसाने धरणाचे काम पूर्ण; तालुक्याला मिळणार पूर्ण क्षमतेने पाणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । नाशिक । मांजरपाडा प्रकल्पातील देवसाने धरणाचे काम पूर्ण झाले असून, यावेळी तालुक्याला पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला तालुक्यातील अनकुटे येथे पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव पोहच कालवा रेल्वे क्रॉसिंग कामाची पाहणी  करतांना पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रा.अ. शिंपी, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, अंदरसूल बाजार समितीचे माजी सभापती मकरंद सोनवणे, येवला बाजार समितीचे माजी  संचालक नवनाथ काळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब गुंड, सुनिल पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, साहेबराव आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा फायदा कालवा लाभ क्षेत्रातील 40 किलोमीटरमधील सर्व गावांना होणार आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या ब्लॉक व गर्डरचे जलदगतीने झालेले काम पाहतांना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेवटच्या टप्प्यातील उर्वरित काम येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नवीन कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने येवला तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसेच सिमेंट लायझिंगच्या कामासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने लसीकरणाची व्याप्ती वाढवावी

जिल्ह्यात कोरोना साथरोगाचा प्रार्दूभाव जरी कमी झाला असला तरी संकट अद्याप टळलेले नाही, याचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यावे. सर्वानी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करा, अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!