दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । सातारा । प्रसिद्ध गायिका ‘योगिता बोराटे’ यांची संगीत क्षेत्रात आघाडीची गायिका म्हणून ओळख आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांनी संगीत कला जोपासली आहे. त्यांची स्वामी समर्थ यांच्यावरची अपार भक्ती पाहता, त्यांनी नुकतचं ‘तारणहार’ हे भक्तीमय गीत प्रदर्शित केलं आहे. तसेच योगिता बोराटे यांनी हे गीत गायलं असून ‘शंतनू हेरलेकर’ यांनी या गाण्याचे संगीत व संगीत संयोज केले आहे. तर ‘दिपाली आसोलकर’ हीने हे गीत शब्दबद्ध केले आहे. या गीतामध्ये ‘तबला’ वादन ‘प्रसाद पाध्ये’ यांनी केले असून ‘बासरी’ ‘अवधूत फडके’ यांनी वाजवली आहे. या गीताचे चित्रीकरण ‘समीर बोराटे’ यांनी केले आहे.
गायिका ‘योगिता बोराटे’ या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या ‘स्वरमेघा क्रिएशन्सच्या’ संस्थापिका आहेत. त्यांची ‘स्वरमेघा म्युझिक’ अकॅडमी देखिल आहे. ‘स्वरमेघा क्रिएशन्सच्या’ अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. याआधी त्यांची ‘दिल लगी ये तेरी’ आणि ‘हम हात जोडे दोनो’ ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. तर ‘घोर अंधारी रे’ हे गुजराती गाणं देखिल सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये त्यांनी २ ते ३ महिने संगीत कार्यक्रम केलेले आहेत.
गायिका योगिता बोराटे ‘तारणहार’ या गीताविषयी म्हणतात, ”मला लहानपणापासूनच अध्यात्मिक भक्ती गीतांची आवड आहे. शालेय शिक्षणासोबतच मी संगीताचे शिक्षण घेतले. स्वामी समर्थांना मी माझे गुरू मानते. यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने मी ‘तारणहार’ हे गाणं प्रदर्शित करायचं ठरवलं. त्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. परंतु ते म्हणतात ना योग्य वेळी त्या गोष्टी ठरलेल्या असतात. आणि हे गीत प्रदर्शित झालं.”
पुढे योगिता, या गीताच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा सांगतात, ”मी जेव्हा हार्मोनी स्टुडिओ येथे हे गीत रेकॉर्ड करत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं मागेच स्वामींची मूर्ती आहे. त्यानंतर अवघ्या ‘वन टेक’मध्येच मी हे गीत गायले. ‘तारणहार’ गीताच्या रेकॉर्डींगचा अविस्मरणीय अनुभव कायम माझ्या स्मरणात राहील. या गाण्यात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली. त्या सर्वांचे मी ऋणी आहे.”