
स्थैर्य, सातारा , दि. 7 सप्टेंबर : शहरासह जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांनी बुधवारी अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. त्याशिवाय अनंत चतुर्दशी दिवशीच्या आदल्यादिवशी काही मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शेटे चौकातील मानाच्या प्रकाश मंडळाच्या शिस्तबद्ध मिरवणुकीचा प्रारंभ झाला. पालिकेने गणपती विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती. विसर्जनासाठी तयार केलेल्या सर्व कृत्रिम तलावांवर जीव रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्था याचे नियोजन करण्यात आले होते. याशिवाय आपत्कालीन स्थितीसाठी औषधोपचार कीटची सोय करण्यात आली होती.
पावसाने काहीशी उसंत दिल्याने उत्साह संचारला होता.
या मिरवणुकी पाठोपाठ शहरातील पोलिस मुख्यालयातील बाल हनुमान मंडळ, मल्हार पेठेतील सुवर्ण युग मंडळ, शिक्षक बँक, शिवपार्वती मंडळ, क्रांती मंडळ, मानाचा अखिल भाजी मंडईच्या राजाची मिरवणूक दुपारी तीन वाजता सुरू झाली. कार्यकर्त्यांनी गणेशाची ट्रॅक्टर ट्रॉली ओढत गणपती बाप्पाचा जयजयकार केला. अष्टविनायक मंडळाचा ढोलांचा थरथराट भर उत्साह वाढवणारा होता. गोल्डन मंडळ, ओमकार मंडळ, क्रांतिवीर, केसरकर पेठेतील बालस्फूर्ती, अष्टविनायक मंडळ, मार्केट कमिटीचा राजा आदी गणेश मंडळांची ही मिरवणूक लक्षवेधक ठरत होती. पोलिस मुख्यालयातील बाल हनुमान मंडळात विविध पोलिस अधिकारी व कर्मचारी धोतर, कुर्ता या महाराष्ट्रीयन पोशाखात सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंदी घातल्याने राधिका रोडवर तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात गणपती विसर्जन होते. या ठिकाणी शंभर फुटी क्रेनची मदत घेत अनेक मोठे गणपतींचे अलगदपणे तलावातील पाण्यात विसर्जन करण्यात आले.
शहर आणि परिसरामध्ये तब्बल सव्वासातशे सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. यातील सुमारे दीडशेहून अधिक मंडळांनी आदल्या दिवशीच विसर्जन केले. विसर्जनमार्गाचा आढावा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी घेतला. राजवाडा, मोती चौक, प्रतापगंज पेठेतून सावरकर पथमार्गे बुधवार नाका परिसरातील कृत्रिम विसर्जन तलावावर मिरवणूक काढण्यात आली. तसेच कमानी हौदाच्या दिशेने येणार्या विसर्जन मिरवणुकांना स्वतंत्र मार्गिका देऊन पुन्हा राजवाड्यावरून प्रस्थापित मार्गाने वळवले गेलेे. वाहतूक व्यवस्थेचा ताण येऊ नये याकरिता मुख्य विसर्जन सोहळ्याची रंगीत तालीमही विसर्जुन पूर्वसंध्येलाच घेतली होती.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर 30 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात होते. गोडोली तळे, आयुर्वेदिक गार्डन परिसर, दगडी शाळा, हुतात्मा उद्यान केंद्र तसेच भवानी तलाव परिसर येथे गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. सातारा पालिकेच्या 140 कर्मचार्यांची तुकडी तेथे सज्ज होती. प्रत्येक तळ्यावर दोन जीव रक्षक नेमण्यात आले होते. सातारा पोलिस दलाने 18 अधिकारी, साडेसहाशे कर्मचारी आणि एक आरसीपी तुकडी बंदोबस्तासाठी सज्ज ठेवली आहे. पॉईंटवर सीसीटीव्ही कॅमेर्यांसह बंदोबस्त तैनात करण्यात होते.