रयतचे समर्पित व्यक्तिमत्व : पै.इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकले.त्यांनी आपल्या
विद्यार्थ्यांना रयत सेवक तयार केले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील कर्मवीरांचा त्यागी जीवनाचा आदर्श घेऊन रयत शिक्षण
संस्थेच्या कार्यात सचोटीने कार्य केले. कोणत्याही सुखाच्या मागे न लागता त्यागमय जीवन जगून अनेक चिमण्या जीवाना ज्ञानी
बनवून कर्तबगार केले. यातले एक त्यागी व्यक्तिमत्व,रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव म्हणजे पै.इस्माईलसाहेब मोहम्मद साहेब
मुल्ला. आपल्या वाट्याला अनेक अडचणी आल्या तरी ज्ञानी असूनही साधे सरळ जीवन जगून त्यांनी समर्पित जीवनाचा आदर्श
उभा केला.आज १७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचा स्मृतिदिन. त्यांचे कृतज्ञ जीवन समजून घेतले की आपल्याला देखील कसे जगावे
,कुणासाठी जगावे हे कळायला लागते. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या प्रेरणादायी समर्पित आयुष्याचे संस्कार सर्वत्र पोचावेत
म्हणून त्यांच्या नावाने असेच कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यासाठी ‘इस्माईलसाहेब मोहम्मद साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार
दरवर्षी द्यायचे सुरु केले आहे. या वेळी २२ डिसेंबर२२ रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
महाविद्यालयात हा पुरस्कार मा.दिलीप बाबासाहेब भोसले,सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश,उच्च न्यायालय अलाहाबाद यांना हा
पुरस्कार देण्यात येणार आहे.

पै.इस्माईल साहेब मोहम्मद साहेब मुल्ला यांचे जन्मगाव काले. जिथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यांचा जन्म १५
जुलै १९०९ साली झाला. लहानपणीच वडील वारले. मुल्लासाहेब यांच्या आई यांनी स्वतः अशिक्षित असूनही त्यांना काबाडकष्ट
करून शिकविले. घरची गरिबी होती. त्यावेळी व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत १० जिल्ह्यात प्रथम आले होते. कर्मवीर अण्णांनी
त्यांना १९२६ मध्ये सातारा येथील बोर्डिंगमध्ये आणले.मॅट्रिक झाल्यानंतर कर्मवीरांनी पुढे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे
येथे पाठवले.आपला विद्यार्थी कायद्याच्या सर्वोच्च स्थानी असावा ही कर्मवीरांची तशीच इस्माईलसाहेब यांची इच्छा होती.
पुण्याला असतानाच गावाकडे त्यांच्या आईचे निधन झाले. याच वेळी त्यांची वार्षिक परीक्षा चालू होती.आईचे निधन झाल्याचे
त्यामुळे त्यांना कळू दिले नाही. पण त्यांना अस्वस्थ वाटल्याने ते घरी आले तेंव्हा आई गेली आणि तिला दफन केल्याचे त्यांना
कळाले. आता आपली आईही नाही याचे दुःख त्यांच्या मनात कायम राहिले. आई विना हे जग त्यांना सुने वाटू लागले.बी.ए
.एल.एल,बी हे कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यावर अण्णांनी त्यांना १९३७ साली धनंजयराव गाडगीळ यांच्याकडे ठेवले.
वकील झाल्यानतर साताऱ्यातच त्यांनी वकिली करायचे ठरविले. आणि ज्या संस्थेने आपणास उभे केले तिचे कार्य करायचे हे
मनोमन ठरवले. सातारा येथील कायदेपंडित रा.ब .काळे यांचे शिष्य आर.पी.पाटील यानी वकिली व्यवसायात मुल्लासाहेब
यांना मार्गदर्शन केले.कर्मवीर अण्णा हेच आपले मातापिता आणि वसतिगृह ,संस्था हाच त्यांचा परिवार झाला. १९३५ मध्ये ते
संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य होते. १९३७ साली कर्मवीर अण्णांनी शाहू बोर्डिंग मधील १२ विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये
आजन्म सेवा करण्याची शपथ दिली.१२ विद्यार्थ्यात पहिली शपथ घेणारे मुल्लासाहेब होते.मुल्लासाहेब साधे राहत असत
पायजमा,शर्ट,काळा कोट,व काळी टोपी असा त्यांचा पेहराव होता..कपड्याला कधी इस्त्री नसे.स्वत: कपडे धूत.आपल्या आईने
आपल्यासाठी कष्ट उपसले पण आपल्या शिक्षणाने तिला सुख देता आले नाही.मग आपण तरी सुखोपभोग का घ्यावा असे त्यांच्या
मनाला वाटत असे.मातृभक्त इस्माईलसाहेब यांनी विरक्त असल्यासारखे जीवन जगले.

१९३८ ला कर्मवीर अण्णांनी व्हालंटरी शिक्षणाची कल्पना मांडली.५७८ शाळा काढल्या.या शाळांचे पहिले चेअरमन इस्माईल
साहेब मुल्ला होते. १९४८-४९ या काळात चुकीच्या निर्णयाने रयत संस्थेचे अनुदान सरकारने बंद केले अशा कठीण
परिस्थितीमध्ये १९४७ ते १९४९ या काळात मुल्लासाहेब संस्थेचे उपाध्यक्ष होते.पण याच काळात धैर्य बाळगून त्यांनी प्रशासन
केले. मुल्लासाहेब यांच्या पत्नी अमिनाबी अकाली निधन पावल्या. कु.नसीम व दिलावर ही त्यांची दोन मुले. त्यांचे पालनपोषण
त्यांनी केले.त्यांना आई आठवू दिली नाही. पुढे नसीम इंग्रजीत एम.ए. झाली. दिलावर हे वकील झाले. वडिलांच्यानंतर ते देखील
संस्थेचे कायदेशीर सल्लागार झाले. १९५१ ते १९७३ या काळात त्यांनी संस्थेचे मानद सचिव म्हणून काम केले. १९२६ ते
१९७३ असा ४६ वर्षाचा काळ त्यांनी संस्थेच्या सेवेत घालविला. संस्थेच्या शाळेत प्रवेश घेणारे पहिले विद्यार्थी ते
होते. आयुष्यभर साधी राहणी आणि उच्च विचार असे त्यांचे जीवन गेले. ६ वाजेपर्यंत कोर्टात काम करून ६ नंतर ते संस्थेचे काम
करीत असत. कर्मवीर यांच्या प्रमाणेच मुल्लासाहेब हे द्रष्टे होते.संस्थेचा संख्यात्म,गुणात्म आणि भौतिक विकास करण्यासाठी
त्यांनी योगदान दिले.साताऱ्यातील कुपर बंगला ,कल्याणी बराकची जागा,पंचायत राज सेंटर ,संस्थेची इन्जिनिअरिन्ग कॉलेजची
जागा यांचा विकास त्यांच्या दूरदृष्टीने झाला. त्यांची मुलगी नसीम ही शैक्षणिक दृष्ट्या पात्र असून देखील कधी त्यांनी तिची
संस्थेत नोकरीची ऑर्डर काढली नाही. असे हे निर्लोभी व्यक्तिमत्व होते. संस्थेचे अध्यक्ष बंडो गोपाळ मुकादम यांनी अध्यक्षपदाचा
राजीनामा दिल्यानंतर आण्णा त्यांना अध्यक्ष करू पाहत होते पण त्यांनी नकार देऊन प्रत्यक्ष काम करण्यासाठी सचिव पद
स्वीकारले. संस्थेचे काम करताना स्वतःच्या पैशाने ते चहा घेत असत.संस्थेच्या कामासाठी बाहेरगावी जाताना देखील स्वतःचा
जेवणाचा डबा घरून नेत असत.९ मे १९५९ ला अण्णांचे निधन झाल्यावर संस्थेचे अस्तित्व अबाधित ठेवणे,संस्था एकसंघ ठेवून
तिचा विकास करणे ही जबाबदारी त्यांनी घेतली.संस्थेचे माजी चेअरमन रामभाऊ नलावडे,अप्पासाहेब पाटील व
इस्माईलसाहेब मुल्ला यांनी संस्थेचा ज्ञानरथ पुढे नेला असे मत डॉ.अनिल पाटील व्यक्त करतात. कर्मवीर यांचे नातू अनिल
पाटील हे वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथे असताना त्यांना एकदा मनीऑर्डर करून पैसे त्यांनी पाठवले होते. १७ डिसेंबर १९७३
ला मुल्लासाहेब यांना हार्ट अॅटक आला.त्यांना उपचारासाठी आर्यांग्ल हॉस्पिटल मध्ये नेले. मृत्युपूर्वी त्यांनी अप्पासाहेब पाटील

यांना बोलवून त्यांना तीन गोष्टी सांगितल्या.कर्मवीरांनी ध्येयवादाने संस्था उभी केली तिचा विस्तार करा, कर्मवीरांचा शैक्षणिक
आणि समतेचा विचार खेड्यातल्या घराघरात पोहचवा तसेच दिलावर आणि नसीम यांना सांभाळा,आणि संस्थेचे काम करत
असताना माझी चूक झाली असेल,अगर माझेकडून कोणी दुखावले असेल तर मला माफ करा , ही विन्रामता आणि संस्थानिष्ठा
शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यात होती. पत्नी वारल्यानंतर मुलांची आई होऊन त्यांनी मुलांना घडवले.ते स्वतः हाताने स्वयंपाक
करून मुलांना जेवू घालत.त्यांनी दुसरे लग्न न करता सारे आयुष्य मुलांना दिले. दुसऱ्यांची कसलीही सेवा न घेता इतरांची सेवा
करणारे हे व्यक्तिमत्व होते. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून त्यांच्या नावाने ‘इस्माईलसाहेब मुल्ला लॉ
कॉलेज सुरु केले.कष्टाळू ,प्रामाणिक व हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती होती.कर्मवीरानंतर त्यांच्या कुटुंबीय यांच्याप्रती त्यांना
मोठा आदर राहिला. आप्पासाहेब पाटील आणि त्यांची मुले यांना त्यांनी प्रेम दिले.रयत शिक्षण संस्थेचे थोर सेवक,भारतीय
संस्कृतीचे प्रतिक ,रयत शिक्षण संस्थेचे लाल बहादूर शास्त्री अशा अनेक उपमा लोकांनी त्यांना दिल्यात.

निष्ठावानविद्यार्थीसत्य, संयम, नम्रता, सेवाभाव, वक्तशीरपणा, सामाजिकबांधिलकी, करुणा, कष्टाळूपणा, साधेपणा, ज्ञानलालसा, कर्तव्यनिष्ठता, संवेदनशीलता, जाणी व, परखडता,निपक्षपातीपण,नैतिकता,धर्मचिकित्सकता,विनयशीलता,अभ्यासू सू वृत्ती,गुणग्राहकता , साधुत्व, दातृत्व,त्याग,निर्मळता,सहिष्णुता,स्वच्छता,निस्पृहता,इंगजी ,मराठी उर्दू,अरबी ,फारशी या भाषेवर प्रभुत्व,असे गुण त्यांच्यात
होते. निस्वार्थी वृतीने त्यांनी जगापुढे एक आदर्श घालून दिला आहे.कुराण हा धर्मग्रंथ त्यांनी वाचला होता.ईश्वरावर त्यांची श्रद्धा
होती. ’संस्थेचे खरे प्रतिनिधी कोण असतील तर ते मुल्ला’ असे कर्मवीर देखील सर्वाना सांगायचे.त्यांच्या मृत्युनंतर ९ मे१९७५
ला मा.यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते ‘इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज’असे संस्थेने नामकरण केले. रयत शिक्षण संस्थेने आपल्या
कर्तव्यनिष्ठ रयतसेवकाचे चिरंतन स्मारक उभे केले.आज त्यांच्या नावे असेच जीवन जगून चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीस
‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार न्यायमूर्ती मा.दिलीपराव भोसले यांना
देण्यात येणार आहे.मुल्लासाहेब यांचे सद्गुण आपल्यात आले तर रयतेचे कल्याण होईल या अपेक्षेसह कार्यक्रमास उपस्थित
राहण्याचे आवाहन करून सदिच्छा व्यक्त करतो.

प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा ९८९०७२६४४०


Back to top button
Don`t copy text!