स्थैर्य, मुंबई, दि. 11 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
“मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” असं शरद पवार यांनी म्हटलंय.
कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“कोकणवासीयांच्या अपेक्षा पूर्ण होतील हे लक्षात घेऊ. मुख्यमंत्री सतत माहिती घेत आहेत. पालकमंत्री काम करत आहेत. यातून काहीतरी होईल. एका दिवसात प्रश्न सुटणार नाही. लोकांनी धीर सोडला नाही, ते कामाला लागले आहेत. राज्यातील यंत्रणा संकटग्रस्तांच्या मागे उभी आहे. उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, त्यानंतर गरज असेल तर केंद्राशी पण चर्चा करु. मुख्यमंत्री हे प्रश्न घेऊन केंद्राकडे जातील. पर्यटन क्षेत्रासाठी वेगळी अधिकची मदत करण्याची गरज आहे. त्याबाबतही सरकारला सांगू,” असं पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यातल्या विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेबाबतच्या निर्णयावर राज्यपालांवर टीका केली आहे.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं ज्ञान कदाचित ऑक्सफर्डपेक्षा जास्त असेल, कारण ऑक्सफर्डसह अनेक मोठ्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या आहेत,” असा टोला पवारांनी लगावला आहे.