फलटण विजयानंतर देवेंद्र फडणवीस येणार; कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन


फलटण नगरपरिषदेत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीस पुढील ५ दिवसांत शहरात येणार. कार्यकर्त्यांच्या कष्टाचे कौतुक करण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती.

स्थैर्य, फलटण, दि. २१ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या विजयासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्यासोबत स्नेहभोजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या पाच दिवसांत फलटण दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

३५ वर्षांची सत्ता उलथवली

फलटण नगरपरिषदेवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून राजे गटाची एकहाती सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीने २७ पैकी तब्बल १८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर वर्षानुवर्षे सत्ता गाजवणाऱ्या राजे गटाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

कार्यकर्त्यांचा सन्मान

या ऐतिहासिक विजयाचे श्रेय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

“ज्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी या विजयासाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी आणि स्नेहभोजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फलटणला येत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

रणनीतीला मोठे यश

फलटण नगरपरिषदेवर सत्ता खेचून आणण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सूक्ष्म रणनीती आखली होती. या तिघांच्या नियोजनाला आणि महायुतीच्या एकजुटीला हे मोठे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे.

पुढील पाच दिवसांत होणाऱ्या या दौऱ्यामुळे आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!