स्थैर्य, मुंबई, दि १३: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची विशेष सर्वसाधारण सभा प्रबोधिनीच्या वडाळा, मुंबई येथील कार्यालयात शनिवार, दि. १३ मार्च २०२१ रोजी संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रबोधिनीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी गेली सहा वर्ष प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सातत्याने कार्य करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. प्रबोधिनीच्या वतीने मुख्यत्वे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते-कर्मचारी, पदाधिकारी, विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांच्यासाठी क्षमता संवर्धनाचे उपक्रम आयोजित केले जातात. वर्तमान, सामजिक, शैक्षणिक, आर्थिक व राष्ट्रीय प्रश्नांवर परिसंवाद, चर्चासत्रे, गटचर्चा व परिषदांचे आयोजन करणे. हा ही प्रबोधिनीच्या कार्याचा भाग आहे.
या विशेष सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची, तर सचिवपदी विजय (भाई) गिरकर यांची निवड करण्यात आली. प्रबोधिनीच्या कोषाध्यक्ष पदी अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली.