विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । पुणे । कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात सैल होत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील हळूहळू पूर्वपदास येत आहे. त्यामुळे विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील हिवरे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा निधी, स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक जनसुविधा अंतर्गत जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, पंचायत समिती आदींच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात करण्यात येणाऱ्या रस्ते, पूल, व्यायामशाळा, सभागृह आदी विकासकामांचे भूमिपूजन मंत्री वळसे पाटील यांच्या हस्त झाले. हिवरे येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सविता बगाटे, पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर लगेचच पूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले त्यामुळे देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आली. उद्योग, शेती, व्यापार आदींवर गंभीर परिणाम झाला. राज्याचे उत्पन्न घटले असताना मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडे निधी वळवावा लागला. त्यामुळे विकासकामांची गती काही काळ मंदावली होती. आता स्थिती आटोक्यात येत असल्याने राज्याचे उत्पन्नदेखील वाढत असून विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोना अजून संपलेला नाही तरी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिक्रापूर ते पिंपळे खालसा या रस्त्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये, खैरेवाडी ते कान्हूर मेसाई रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती देऊन श्री. वळसे पाटील म्हणाले, हिवरे जवळून जाणाऱ्या कालव्यातून सिंचनाच्या पाणी उचल परवान्याचे प्रश्न, वाहतुकीसाठी पीएमपीएमएल बसची व्यवस्था, ग्रामसचिवाय सभागृहाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद, हिवरे ते व्यंकटेशकृपा साखर कारखाना रस्ता आदी मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.

यावेळी श्रीमती बगाटे, सरपंच शारदा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी हिवरे येथील रस्त्यावरील पूल, रस्ता, रस्त्याचे काँक्रीटीकरण, रस्ता सुधारणा, अंगणवाडी बांधकाम स्मशानभूमी सुधारणा, संरक्षण भिंत बांधकाम, समाज मंदिर दुरुस्ती आदी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच दीपक खैरे, तहसीलदार लैला शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, उपअभियंता लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एस. चनाळे यांच्यासह पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुखई येथील ४० लाख रुपये निधीची तरतूद केलेल्या रस्ता सुधारणा, काँक्रीटीकरण, प्राथमिक शाळा वर्ग खोली बांधणे, जातेगाव बु. येथील सुमारे १ कोटी ४० लाख रुपये निधीची तरतूद केलेल्या अंतर्गत रस्ता सुधारणा, ग्रामक्रीडांगण, रस्ता पूल कामांचे भूमिपूजनदेखील मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जातेगाव येथील कार्यक्रमात श्री. वळसे-पाटील यांनी पोट चारी खोलीकरण, पाणीप्रश्न रस्ते आदींबाबत आगामी काळातही प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी प्रकाश पवार यांनी वेळ नदीवरील बंधाऱ्यांची कामे वळसे-पाटील यांनी मार्गी लावण्याचा उल्लेख करून येथे चांगल्या शैक्षणिक सुविधा उभ्या करण्यात त्यांनी मदत केली असेही सांगितले.


Back to top button
Don`t copy text!