स्थैर्य, पाटण, दि. 18 : निवडणुकांमध्ये झालेला जय-पराजय स्वीकारून जो नेता जनतेशी, सर्वसामान्य लोकांशी असलेली नाळ जपतो तोच खरा नेता. विक्रमसिंह पाटणकर दादांनी ही नाळ आजपर्यंत जपली आणि सत्यजितसिंह सुद्धा हेच नाते मोठ्या आपुलकीने जपत आहेत. पाटणकर घराणे आणि पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता येणार्या काळात सत्यजितसिंह यांना आमदार करेल, यात शंका नाही. पाटणच्या जनतेने मी म्हणजेच सत्यजितसिंह समजावे. पाटणसाठी विकासकामे कमी पडू देणार नाही, असे वक्तव्य आ. शशिकांत शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवड करण्यात आली. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते पाटणकर यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आ. शिंदे म्हणाले, पक्ष संकटात असताना महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक असे अनेक मातब्बर नेतेमंडळी पक्ष सोडून जात असताना सत्यजितसिंह आणि विक्रमसिंह पाटणकर दादांनी पवार साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली नाही. पाटणकर घराण्याची पवार साहेबांवर असलेली निष्ठा आणि पवार साहेबांचे पाटणवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहेच. पाटण मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सत्यजितसिंह यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहिलो आहे आणि यापुढेही कायम राहीन.
यावेळी विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, आ. शिंदेंसारखा निष्ठावंत तरुण नेता पक्षाला लाभला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाग्य आहे. शिंदें सारख्या नेत्यांमुळे पक्षाला बळ मिळाले आहे. आ. शिंदे एक तडफदार आणि आक्रमक नेते आहेत. त्यांचा हा आक्रमकपणा सातारा जिल्ह्यात जास्तीतजास्त विकासकामे खेचून आणण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, आ. शिंदे यांनी पाटण मतदारसंघाला मंत्रिपदाच्या कार्यकाळापासून नेहमीच ताकद दिली आहे. पाटण मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड होता आणि यापुढेही राहणार आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या राजकीय ताकदी विरोधात लढण्यासाठी सक्षम आहेत. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो आणि यापुढेही राहणार आहे. येणार्या काळातील प्रत्येक निवडणुकीत मी व माझे कार्यकर्ते सर्व ताकदीने पक्षाचे काम करू. विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुकांमधून बोध घेऊन पुन्हा एकदा पक्षामध्ये चैतन्य निर्माण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आ. शिंदेंची कामाची पद्धत आम्ही त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात अनुभवलेली आहे. सर्व सामान्य माणसाला ताकद देणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. पाटण मतदारसंघाला आ. शिंदे नक्कीच बळ देतील यात शंका नाही.
यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार, उपसभापती प्रताप देसाई, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, अध्यक्ष राजाभाऊ काळे, तांबवे-सुपने विभागातील रवींद्र ताटे, शंकरराव पाटील, निवासराव शिंदे, अॅड. विश्वासराव शिंदे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकर घाडगे, सुभाष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेडगे, पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष गुरुदेव शेडगे, अविनाश पाटील, पं. स. सदस्य विलास देशमुख, माजी पंचायत समिती सदस्या सौ. शोभा कदम, पाटणचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, सचिन जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनामुळे यावेळी मर्यादित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचीच उपस्थिती होती.
राजाभाऊ काळे यांनी स्वागत केले. शंकर शेडगे यांनी आभार मानले.