दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरात विविध विकास कामे होत असून सदर कामे दर्जेदार होतील. प्रभाग क्र.11 च्या नगरसेविका अॅड.सौ.मधुबाला भोसले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या भागातील विकास कामे प्रगतीपथावर आहेत, असे प्रतिपादन फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी केले.
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील बारस्कर गल्ली भागातील विविध विकासकामांचा शुभारंभ पांडुरंग गुंजवटे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका अॅड.सौ.मधुबाला भोसले, श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटण पालिकेचे अभियंता साठे, सिकंदर डांगे, नाना मोहिते आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
अॅड.सौ.मधुबाला भोसले म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 11 मध्ये ओपन जिम, पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर रस्ता डांबरीकरण, दत्तनगर परिसरात पाईपलाईन तसेच शौचालयाचा प्रश्न, स्वामी विवेकानंद नगर मधील सर्व डांबरी रस्ते , काँक्रीट गटाराची कामे, बारस्कर गल्लीतील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूध आदींचे वाटप करून आधार देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ना.श्रीमंत रामराजे, आ.दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या भागातील विविध विकास कामे आपण मार्गी लावू शकलो याचे समाधान आहे.
यावेळी बारस्कर गल्ली भागातील पिण्याच्या पाण्याची नवीन लाईन, गटारासाठी सिमेंट पाईप लाईन आणि नवीन डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला .
अॅड.सौ. मधुबाला भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तेजसिंह भोसले यांनी आभार मानले.