पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । पालघर । किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली असून पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाला त्याप्रसंगी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

देशाच्या आर्थिक राजधानीपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये उद्योग, विविध प्रकल्प यावेत यासाठी शासन प्रयत्नशील असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्याची नूतन प्रशासकीय इमारत देशामध्ये सुसज्ज इमारत मानली जाते. या इमारतीमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. येत्या काळात अनेक सुविधा या जिल्ह्याला उपलब्ध होणार आहेत आदिवासी बांधव बहुसंख्येने या जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने आदिवासी बांधवांचा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याला ओळखले जाते. आदिवासी बांधवांच्या हाताला काम देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (दूरदृश्य प्रणाली द्वारे), खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग (दूरदृश्य प्रणालीद्वारे) राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त दिनकर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!