
स्थैर्य, टाकूबाईचीवाडी, दि. २८ ऑगस्ट : गेली तीस वर्षे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखून विकासाचे राजकारण केले. दहशत किंवा सूडबुद्धीच्या राजकारणाला त्यांनी कधीही थारा दिला नाही, त्यामुळेच फलटण तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केले. विरोधक केवळ गैरसमज पसरवून दिशाभूल करण्यात पटाईत आहेत, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
मौजे टाकूबाईचीवाडी येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना माजी आमदार चव्हाण म्हणाले की, धोम – बलकवडी धरणाचे आणि कालव्याचे काम श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच झाले हे कोणीही नाकारू शकत नाही. या धरणाच्या कामामुळे वंचित राहिलेल्या टाकूबाईचीवाडी, सासवड, कापशी या भागांसाठी पाईपलाईन योजना (PDN) मंजूर करून आणली. आदर्की (७ कोटी) आणि आळजापूर (२१ कोटी) येथील फाट्यांची कामे आता सुरू झाली असून, त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता.
सध्याचे नवीन आमदार केवळ जुनीच कामे सुरू असल्याचा देखावा करत आहेत. वर्षभरात त्यांना साधा आमदार निधीही मिळालेला नाही. तालुक्यात विकासकामे केवळ राजे गटाच्या माध्यमातूनच झाली आहेत, मग ती पाणीपुरवठा योजना असो, व्यायामशाळा असो किंवा शाळेच्या इमारती असोत. मात्र, आता काळ बदलला असून, केलेली कामे लोकांना सांगावी लागत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, पराग भोईटे, बाळूकाका नलवडे, संजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.