दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । फलटण । साखरवाडी गावाचा विकास करण्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कधीही मागे पुढे पहिले नाही. साखरवाडी गावाचा विकास करण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून भरीव निधी हा नेहमीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आगामी काळामध्ये सुद्धा साखरवाडी गावामध्ये विकासकामांच्या बाबतीत ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे नेहमीच अग्रेसर राहतील, असे मत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
साखरवाडी गावच्या हद्दीतील मारीमाता देवी सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी फलटणचे आमदार दीपक चव्हाण बोलत होते. या वेळी महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, पंचायत समिती सदस्य सौ. रेश्मा भोसले, अभयसिंह नाईक निंबाळकर, किरण साळुंखे, शरद जाधव, अरुण गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
साखरवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची असेल तर कार्यकर्त्यांनी मागचा विचार न करता आतापासूनच सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून जनतेची कामे करणे गरजेचे आहे. जनतेच्या समस्या सोडवणे हाच अजेंडा ठरवून कार्यकर्त्यांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यामधील जास्तीत जास्त विकासकामे हि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व राजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय इतरांना घेवू देवू नका व त्याचे भांडवल करून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू देवू नका. आगामी काळामध्ये गाफील न राहता राजे गटाच्या माध्यमातून केले गेलेली सर्व कामे जनते पर्यंत पोहचवण्याचे काम कार्यकर्त्यानी करणे गरजेचे आहे, असे मत सुद्धा या वेळी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
मागील पाच वर्षांमध्ये राजे गटाच्या माध्यमातून एकही कार्यक्रम झाला नसल्याने नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आले. हि कामे राजे गटाने केली नसून मी केलेली आहेत, अशी भावना काही जणांनी तयार करून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला. साखरवाडी गावातील नागरिकांच्या मनामध्ये तयार झालेला संभ्रम काढण्याचे काम आगामी काळामध्ये राजे गटाच्या कार्यकर्त्ये करतीलच त्या सोबतच आगामी काळामध्ये आमदार दीपक चव्हाण यांनी वेळोवेळी साखरवाडी यावे व नागरिकांच्या मनामध्ये तयार झालेला संभ्रम दूर करण्याचे काम करावे, असे मत माजी सभापती शंकरराव माडकर यांनी या वेळी व्यक्त केले.