
स्थैर्य, फलटण ,दि. ०५ ऑगस्ट : सोलापूर जिल्हा दौऱ्यावरून पुण्याकडे जात असताना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. संजय शिरसाट यांनी फलटण येथे धावती भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाच्या वाढीसाठी वेळ देण्याचे आणि सामाजिक न्याय विभागामार्फत तालुक्यासाठी लवकरच विकासकामे देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान फलटण तालुका शिवसेना प्रमुख श्री. नानासो इवरे यांनी मंत्र्यांचे स्वागत केले आणि तालुक्यातील कामांची माहिती दिली. सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, “सामाजिक न्याय विभागात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच आपण काम करत आहोत.”
त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा आणि पक्ष बांधणीचा आढावा घेतला. “तुम्ही ताकदीने काम करत राहा, शिवसेना पक्ष आणि एक मंत्री म्हणून मी फलटणच्या शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी उपतालुकाप्रमुख सुखदेव फुले, युवा सेना प्रमुख प्रतिक रिठे, दिपक शिंदे, हनुमंत जाधव, सुनील मिंड, सोमनाथ गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.